Mahakumbh 2025: चेंगराचेंगरीच्या काही तासांनंतर हेमा मालिनी यांनी महाकुंभमध्ये केलं पवित्र स्नान

बुधवारी पहाटे महाकुंभमधल्या संगम घाटावर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने या पवित्र सोहळ्याला गालबोट लागलं. या चेंगराचेंगरीच्या काही तासांनंतर भाजप खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी प्रयागराजमध्ये पवित्र स्नान केलं.

Mahakumbh 2025: चेंगराचेंगरीच्या काही तासांनंतर हेमा मालिनी यांनी महाकुंभमध्ये केलं पवित्र स्नान
Hema Malini
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 29, 2025 | 9:21 AM

मौनी अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर भाजप खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमधील पवित्र स्नानात सहभाग घेतला. यावेळी त्यांच्यासोबत जुना अखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी महाराज आणि योगगुरू बाबा रामदेवसुद्धा होते. या सर्वांनी त्रिवेणी संगम याठिकाणी शाही स्नानमध्ये भाग घेतला. मकर संक्रांतीनंतर मौनी अमावस्येला दुसरं अमृत स्नान असल्याने यासाठी मोठ्या संख्येने भाविक जमले होते. यामुळे बुधवारी पहाटे संगम इथं चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेच्या काही तासांनंतर हेमा मालिनी यांनी शाही स्नान केलं.

पवित्र स्नानानंतर हेमा मालिनी म्हणाल्या, “हे माझं भाग्य आहे. मला खूप चांगलं वाटलं. इतके कोटी लोक इथे आले आहेत. मलाही इथे पवित्र स्नानाची संधी मिळाली. यासाठी धन्यवाद.” मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास याठिकाणी चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. महाकुंभमध्ये लाखोंच्या संख्येने भाविक येत आहेत. संगम घाटावरील बॅरिकेट्स तुटल्याने ही चेंगराचेंगरी झाली होती. यात अनेक जण जखमी झाले असून 10 जणांचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर येत आहे. ही परिस्थिती पाहता अमृतस्नानही रद्द करण्यात आले आहेत.

हेमा मालिनी या महाकुंभमध्ये कथाकार देवकीनंद ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सनातन धर्म संसदेत पोहोचल्या होत्या. तिथं त्या म्हणाल्या, “आमच्या सनातन धर्माबद्दल आणि सनातनी लोकांबद्दल वाईट बोलणारे काही अज्ञानी लोक आहेत. काही चुकीच्या गोष्टी सांगतात. सनातन हा जगातील एकमेव धर्म आहे जो सर्व धर्मांचं स्वागत करतो. सनातन धर्म कोणत्याही धर्माला विरोध करत नाही, मग तो मुस्लीम असो किंवा ख्रिश्चन.”

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क साधून तातडीने मदतीचे आदेश दिले. तर केंद्रीय गृहमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. मौनी अमावस्येच्या मुहूर्तावर बुधवारी प्रयागराजमधील त्रिवेणी संगम याठिकाणी दहा कोटींहून अधिक भाविक पवित्र स्नान करतील, अशी अपेक्षा होती. मौनी अमावस्या हा पवित्र स्नान करण्याचा सर्वांत शुभ दिवस मानला जातो.