Dharmendra Expired : ‘एका युगाचा अंत ..’ धर्मेंद्र यांच्या निधनानंतर बॉलिवूड शोकाकुल, राजकारण्यांनीही वाहिली श्रद्धांजली

शोले, चुपके चुपके,ड्रीमगर्ल ते अगदी आत्ता आलेला रॉकी और रानी की प्रेमकहानी या चित्रपटापर्यं.संपूर्ण पडदा व्यापून टाकणारं भारदस्त व्यक्तिमत्व म्हणजे अभिनेते धर्मेंद्र देओल. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

Dharmendra Expired :  एका युगाचा अंत .. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर बॉलिवूड शोकाकुल, राजकारण्यांनीही वाहिली श्रद्धांजली
धर्मेंद्र यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा
| Updated on: Nov 24, 2025 | 3:10 PM

देखणा चेहरा, लुभावणारं हास्य आणि दमदार संवादफेक.. शोले, बंदिनी, हकीकत, मेरा कसूर क्या है,  चुपके चुपके, ड्रीमगर्ल ते अगदी आत्ता आलेला रॉकी और रानी की प्रेमकहानी या चित्रपटापर्यं.संपूर्ण पडदा व्यापून टाकणारं भारदस्त व्यक्तिमत्व म्हणजे अभिनेते धर्मेंद्र देओल. बॉलिवूडचा हाँ देखणा हिरो अखेर आज काळाच्या पडद्याआड गेला. आज सकाळी मुंबईतील निवासस्थानी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला.ते 89 वर्षांचे होते. तब्बल 65 वर्ष चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या धर्मेंद्र यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली असून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर हाही धर्मेंद्र यांच्या जाण्यामुळे शोकाकुल झाला असून त्याने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर धर्मेंद्र यांचा एक देखणा फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘एका युगाच अंत .. एक अतिशय मोठा, भव्य मेगास्टार..मेनस्ट्रीम सिनेमामधील हिरोची मूर्तीमंत व्याख्या, अतिशय देखणा हिरो.. ‘ अशा शब्दांत एक लांबलचक पोस्ट लिहीत करण जोहरने धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत त्यांच्या आठवणी जागवल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला. ते एक प्रतिष्ठित चित्रपट व्यक्तीमत्व आणि असाधारण अभिनेते होते, असं लिहीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली.

 

 

‘शोले’मध्ये त्यांनी साकारलेला ‘वीरू’ आजही घनिष्ठ मैत्रीचं प्रतीक – शरद पवार यांनी वाहिली आदरांजली

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ट्विटरवरून धर्मेंद्र यांना आदरांजली वाहिली. ‘१९६० च्या दशकात भारतीय सिनेसृष्टीत पदार्पण करून चित्रपटात सर्वसामान्य माणसांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कथानकांमधून उठावदार भूमिका साकारणारे आणि भारतीय प्रेक्षकांची मनं जिंकून सिनेजगतात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. आताच्या तरुणाईला कल्पना नसेल पण एक पिढी त्यांच्या लकबीची, त्यांच्या केशभूषेची, वेशभूषेची चाहती होती. ‘शोले’मध्ये त्यांनी साकारलेला ‘वीरू’ आजही घनिष्ठ मैत्रीचं प्रतीक आणि तडफदार नायक म्हणून भारतीय रसिकमनांवर अधिराज्य गाजवतो आहे’ असं ते म्हणाले.

‘अनेक वेळा ‘शोले’मधील त्यांचा पाण्याच्या टाकीवरील खुमासदार प्रसंग आजही आमच्या राजकीय क्षेत्रात उत्साही कार्यकर्ते आंदोलन म्हणून अंगिकारतात. ‘धरम वीर’, ‘चुपके चुपके’, ‘सत्यकाम’, ‘अनुपमा’, ‘मेरा गाँव मेरा देश’ आणि ‘ड्रीम गर्ल’ ह्यासारख्या जवळपास २५० सुप्रसिद्ध कलाकृतीत धर्मेंद्र ह्यांनी साकारलेल्या भूमिका कायम स्मरणात राहतील. सिनेसृष्टीच्या ‘धरम पाजीं’ना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व देओल कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो’ संही त्यांनी नमूद केलं.

 

‘हि-मॅन’ची एक्झिट चटका लावणारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणारा लखलखता तारा निखळल्याची शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ अभिनेते पद्मभूषण धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली . स्वप्नाळू, युवा नायक ते तडफदार-बलंदड नायक म्हणून साकारलेल्या वैविध्यपूर्ण भूमिका आणि पुढे बॉलिवुडचा हि-मॅन म्हणून लौकीक मिळवेलेले ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र चित्रपट रसिकांच्या सदैव स्मरणात राहतील, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी म्हटले.

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा हिंदी चित्रपट सृष्टीतला प्रवास वैशिष्ट्यपूर्ण राहिला. कृष्ण- धवल काळ ते रंगीत आणि अलिकडच्या तांत्रिकदृष्ट्या आधुनिक प्रवाहात ते कार्यशील राहिले. ते चित्रपट सृष्टीतील बदलाचे, भरभराटीपासून ते आतापर्यंतच्या काळाचे महत्वाचे साक्षीदार राहिले. नायक म्हणून तरूण वयात सालस, स्वप्नाळू नायक ते विविध चित्रपटात वाट्याला आलेल्या भूमिका त्यांनी अभिनयाने आयकॉनिक ठरवल्या. शोले चित्रपटातील पडद्यावरील वीरू प्रमाणेच ते प्रत्यक्षातही मैत्र जपणारे होते. सहृदय आणि जुन्या-नव्या पिढीला जोडणारे, अनेकांसाठी आधार, मार्गदर्शक व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती होती. या क्षेत्रातील ज्येष्ठत्व ते तितक्याच उमद्यापणाने मिरवत असत. मध्यंतरी त्यांनी लोकसभेत भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून बिकानेरचे प्रतिनिधीत्व केले होते. पण त्यांनी चित्रपटसृष्टी आणि अभिनय, या क्षेत्रातील प्रयोगशीलता यांनाच अधिक प्राधान्य दिले, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी शोकसंदेशात नमूद केलं.

सुमारे तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. एकाच वर्षांत ९ हिट चित्रपट देण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत ते चित्रपट सृष्टीत सक्रिय राहिले. त्यांच्या निधनाने आपल्या चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणारा तारा निखळला आहे. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनामुळे देओल कुटुंबीयांसह, त्यांच्या चाहत्यांवर दुःखाचा आघात झाला आहे. आम्ही या सर्वांच्या दुःखात सहभागी असून त्यांना ईश्वराने आघात सहन करण्याची ताकद द्यावी, अशी प्रार्थना करतो. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनामुळे चित्रपट सृष्टीची मोठी हानी झाली असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आदरांजली

बॉलिवूडचे सदाबहार अभिनेते धर्मेंद्र यांचे आज निधन झाले. आपल्या साठ वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी आपल्या अदाकारीने माझ्यासारख्या अगणित चाहत्यांना निखळ आनंद देण्याचे काम केलं, असं म्हमत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बॉलिवूडच्या ही-मॅन ला आदरांजली वाहिली.

 

अभिनयाचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड -उपमुख्यमंत्री अजित पवार

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका तेजस्वी पर्वाचा अंत झाला असून, अभिनयाचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, धर्मेंद्र यांच्या अभिनयात नैसर्गिकता, साधेपणा आणि मनाला भिडणारी भावनिक ताकद होती. ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘अनुपमा’, ‘सत्यकाम’, ‘दिललगी’ अशा अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत. विशेषतः ‘शोले’मधील त्यांनी साकारलेली ‘वीरू’ची भूमिका रसिकांच्या मनात अजरामर आहे. धर्मेंद्र यांचा चित्रपट प्रवास म्हणजे मेहनत, समर्पण आणि कलाविश्वाप्रती असलेल्या निःस्वार्थ प्रेमाचे प्रतीक आहे. त्यांनी अनेक पिढ्यांतील प्रेक्षकांना आपल्या अभिनयातून निखळ आनंद दिला. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे.

धर्मेंद्र यांनी आपल्या दीर्घ आणि उल्लेखनीय कारकिर्दीत आठ वेळा ‘फिल्मफेअर पुरस्कार’ मिळवले होते. त्यांच्या देखण्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि दमदार अभिनयामुळे त्यांना ‘हिंदी सिनेमा’चा ‘ही-मॅन’ म्हणून ओळख मिळाली होती. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपट सृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटूंबियांना, चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली .

 अजय देवगणनेही व्यक्त केलं दु:ख

अभिनेता अजय देवगण यानेही धर्मेंद्र यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केलं. सिनेसृष्टीने एका दिग्गजाला गमावलं अश शब्दांत त्याने पोस्ट केली आहे.

 

तर धर्मेंद्र हे महान अभिनेते होते. ते कायम स्मरणात राहतील, अशा शब्दांत भावना व्यक्त करत ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली.

अभिनेत्री काजोलनेही वाहिली श्रद्धांजली

बॉलिवूड अभिनेत्री काजोल हिने तिचा मुलगा युग आणि धर्मेंद्र यांचा एक गोड फोटो शेअर करत बॉलिवूडच्या या ‘ही-मॅन’ला अखेरचा निरोप दिला.

 

 

बॉलिवूड कलाकारांनी स्मशानभूमीत घेतली धाव 

धर्मेंंद्र यांच्या निधनाचे वृत्त समजताच बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार हे विलेपार्ले स्मशनाभूमीत पोहोचले. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, सलमी खान, अभिनेता आमिर खान हे स्मशानभूमीत पोहोचले.