“त्या दोघांना लाँच करताना पाण्यासारखा पैसा वाहिला”; बोनी कपूर असं कोणाबद्दल म्हणाले?

मुलांच्या बाबतीत तीच चूक पुन्हा करणार नाही; बोनी कपूर यांचा मोठा निर्णय

त्या दोघांना लाँच करताना पाण्यासारखा पैसा वाहिला; बोनी कपूर असं कोणाबद्दल म्हणाले?
Boney Kapoor
Image Credit source: Twitter
| Updated on: Nov 03, 2022 | 2:56 PM

मुंबई- चित्रपट निर्माते आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांचा ‘मिली’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट त्यांच्यासाठी खूपच खास आहे, कारण यात त्यांची मुलगी जान्हवी कपूरने मुख्य भूमिका साकारली आहे. बोनी कपूर निर्मित चित्रपटात काम करण्याची जान्हवीची ही पहिलीच वेळ आहे. बोनी कपूर यांनी त्यांचे भाऊ अनिल कपूर आणि संजय कपूर यांना बॉलिवूडमध्ये लाँच केलं होतं. मात्र त्यांनी अर्जुन कपूर किंवा जान्हवीच्या बाबतीत असं काही केलं नाही. एका कार्यक्रमात खुद्द त्यांनीच या गोष्टीचा खुलासा केला.

भावंडांना लाँच करण्यासाठी मी पाण्यासारखा पैसा वाहिला, पण जान्हवी आणि अर्जुनसाठी मी असं करणार नाही, असं ते म्हणाले. अर्जुन किंवा जान्हवीला त्यांनी बॉलिवूडमध्ये लाँच का केलं नाही, असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला होता.

“मी अनिल आणि संजयला लाँच केलं होतं. त्यावेळी मला रोखणारं कोणीच नव्हतं. मी साखरेवर गूळ टाकण्याचा प्रयत्न केला आणि नंतर ते इतकं गोड झालं की डायबिटीजचा धोका निर्माण झाला. मी माझ्या भावंडांना लाँच करण्यात कोणतीच कसर सोडली नव्हती. पाण्यासारखा पैसा वाहिला. मात्र माझ्या मुलांना दुसऱ्यांनी लाँच केलं पाहिजे हे मी खूप आधीच ठरवलं होतं. जेव्हा ते पूर्णपणे इंडस्ट्रीत तयार होतील, तेव्हा मी त्यांच्यावर गुंतवणूक करेन”, असं बोनी कपूर म्हणाले.

भावंडांविषयी त्यांनी पुढे सांगितलं, “ही आमची स्ट्रॅटजी होती. अनिल आणि संजय यांना लाँच करण्यात मी खूप पैसे खर्च केले. कारण त्यांच्याशी माझं भावनिक कनेक्शन होतं. मात्र अर्जुन आणि जान्हवीच्या बाबतीत मला ही चूक करायची नव्हती. त्यांना त्यांच्या प्रतिभेनुसार आधी चित्रपट मिळाले पाहिजेत, असा माझा विचार होता.”

अर्जुन कपूरने आदित्य चोप्राच्या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत बनलेल्या ‘इशकजादे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर जान्हवीला करण जोहरने बॉलिवूडमध्ये लाँच केलं होतं. ‘धडक’ या चित्रपटातून तिने करिअरची सुरुवात केली होती. बोनी कपूर यांची दुसरी मुलगी खुशी कपूरसुद्धा लवकरच झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे.

Follow Us