Box Office: ‘लाल सिंग चड्ढा’ आणि ‘रक्षाबंधन’ने दुसऱ्या दिवशी जमवला इतक्या कोटींचा गल्ला

| Updated on: Aug 13, 2022 | 10:47 AM

मोठा वीकेंड आल्याने शनिवारी आणि रविवारी या दोन्ही चित्रपटांची कमाई किती होईल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. लाल सिंग चड्ढामध्ये आमिरसोबत करीना कपूर, मोना सिंग आणि नाग चैतन्य यांच्याही भूमिका आहेत.

Box Office: लाल सिंग चड्ढा आणि रक्षाबंधनने दुसऱ्या दिवशी जमवला इतक्या कोटींचा गल्ला
Raksha Bandhan and Laal Singh Chaddha
Image Credit source: Twitter
Follow us on

आमिर खानची मुख्य भूमिका असलेल्या ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशीही फारशी कमाई केली नाही. शुक्रवारी या चित्रपटाने जवळपास 7 कोटींचा गल्ला जमवला. पहिल्या दोन दिवसांची कमाई जवळपास 19 कोटी रुपये इतकी झाली. अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ (Raksha Bandhan) हा चित्रपटसुद्धा गुरुवारी प्रदर्शित झाला. ‘रक्षाबंधन’ या चित्रपटाने गुरुवारी 8.2 कोटी तर शुक्रवारी 6 कोटी रुपयांचा गल्ला (Box Office Collection) जमवला आहे. मोठा वीकेंड आल्याने शनिवारी आणि रविवारी या दोन्ही चित्रपटांची कमाई किती होईल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. लाल सिंग चड्ढामध्ये आमिरसोबत करीना कपूर, मोना सिंग आणि नाग चैतन्य यांच्याही भूमिका आहेत. तर रक्षाबंधनमध्ये अक्षयसोबत भूमी पेडणेकर, सादिया खतीब, दीपिका खन्ना, स्मृती श्रीकांत आणि सहजमीन कौर यांच्या भूमिका आहेत.

लाल सिंग चड्ढाने पहिल्या दिवशी 12 कोटींची कमाई केली असली तरी या वर्षी प्रदर्शनाच्या दिवशी चांगली ओपनिंग करणाऱ्या पहिल्या तीन चित्रपटांमध्ये त्याचा समावेश झाला आहे. तर दुसरीकडे बॉक्स ऑफिस इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, रक्षाबंधन या सुट्टीच्या दिवशी प्रदर्शित होऊनसुद्धा अक्षय कुमारच्या चित्रपटाच्या कमाईत 30 टक्क्यांनी घट झाली आहे. रक्षाबंधन हा या वर्षातील अक्षयचा तिसरा चित्रपट आहे. याआधी त्याचे बच्चन पांडे आणि सम्राट पृथ्वीराज हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. बॉलिवूडमधल्या या दोन बड्या कलाकारांच्या चित्रपटांची सुरुवात मात्र संथ गतीनेच झाल्याचं मत चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने मांडलं.

हे सुद्धा वाचा

शुक्रवारी दिल्लीतील एका वकिलाने दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांच्याकडे आमिर खान, पॅरामाउंट पिक्चर्स आणि इतर अनेकांविरुद्ध लाल सिंग चड्ढामध्ये भारतीय सैन्याचा अनादर आणि हिंदू भावना दुखावल्याचा आरोप केल्याबद्दल तक्रार दाखल केली. “लाल सिंग चड्ढा या चित्रपटात निर्मात्यांनी असं चित्रण केलं आहे की कारगिल युद्धात लढण्यासाठी एका मतिमंद व्यक्तीला सैन्यात सामील होण्याची परवानगी देण्यात आली होती. कारगिल युद्ध लढण्यासाठी लष्करातील सर्वोत्तम कर्मचारी पाठवले गेले होते आणि लष्करी जवानांना कठोर प्रशिक्षण दिलं गेलं होतं. पण चित्रपट निर्मात्यांनी भारतीय सैन्याचं मनोधैर्य खचवण्यासाठी आणि बदनाम करण्यासाठी हेतुपुरस्सर या परिस्थितीचं चित्रण केलं,” असं वकील विनीत जिंदाल यांनी तक्रारीत म्हटलं आहे.