Prakash Raj: स्वरा भास्करचं ‘मेल व्हर्जन’ म्हणून हिणवणाऱ्याला प्रकाश राज यांचं सडेतोड उत्तर

तुम्ही स्वरा भास्करचं 'मेल व्हर्जन' (male version) आहात, अशी टीका नेटकऱ्यांनी केली. त्यावर आता प्रकाश राज यांनी प्रत्युत्तर दिलंय. विशेष म्हणजे त्यांनी केलेल्या ट्विटवर स्वरा भास्करनेही प्रतिक्रिया दिली आहे.

Prakash Raj: स्वरा भास्करचं मेल व्हर्जन म्हणून हिणवणाऱ्याला प्रकाश राज यांचं सडेतोड उत्तर
प्रकाश राज, स्वरा भास्कर
Image Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Aug 27, 2022 | 11:04 AM

दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) हे बॉलिवूडमध्येही सुप्रसिद्ध कलाकार आहेत. आपल्या दमदार भूमिकांसोबतच ते त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी आणि ट्विट्ससाठी चर्चेत असतात. कलाविश्वासोबतच ते राजकारणातही सक्रिय आहेत. अभिनेता शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबाच्या बाजूने बोलल्याने प्रकाश राज यांना ट्विटरवर चांगलंच ट्रोल करण्यात आलं. तुम्ही स्वरा भास्करचं ‘मेल व्हर्जन’ (male version) आहात, अशी टीका नेटकऱ्यांनी केली. त्यावर आता प्रकाश राज यांनी प्रत्युत्तर दिलंय. विशेष म्हणजे त्यांनी केलेल्या ट्विटवर स्वरा भास्करनेही प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश राज यांच्याप्रमाणेच स्वरा भास्करसुद्धा (Swara Bhasker) ट्विटरवर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

‘गेल्या कित्येक दशकांपासून तो देशभरात प्रेम आणि आनंद पसरवत असताना त्याला (शाहरुख खान) आणि त्याच्या कुटुंबीयांना अशा त्रासात ते कसे ढकलू शकतात’, अशा आशयाचं ट्विट एका नेटकऱ्याने केलं. यासोबतच त्याने शाहरुखचा एक व्हिडीओ पोस्ट केला. प्रकाश राज यांनी हेच ट्विट रिट्विट केलं होतं आणि त्यानंतर त्यांच्यावर टीका होऊ लागली. ‘या ट्विटला कवडीचंही मोल नाही, प्रकाश राज म्हणजे स्वरा भास्करचं मेल व्हर्जनच’, असं ट्विट एका युजरने केलं. या ट्विटरला प्रत्युत्तर देताना प्रकाश राज यांनी लिहिलं, ‘स्वरा भास्करचं मेल व्हर्जन म्हटल्याबद्दल मला त्याचा अभिमान आहे. तुम्ही कोणाचं व्हर्जन आहात?’ या ट्विटवर स्वरा भास्करनेही प्रतिक्रिया दिली. ‘सर, सर, सर तुम्ही स्वत:चंच बेस्ट व्हर्जन आहात’, असं म्हणत स्वराने विविध इमोजी पोस्ट केले. स्वरा आणि प्रकाश राज हे नेहमीच ट्विटरवर सक्रिय असतात आणि अनेकदा ते त्यांच्या ट्विट्समुळे ट्रोलिंगचे शिकार होतात.

सोशल मीडियावरील ट्रोलिंगविषयी स्वरा एका मुलाखतीत म्हणाली होती, “सोशल मीडियावर जेव्हा माझ्यावर टीका व्हायची किंवा युजर राग व्यक्त करायचे, तेव्हा मला खूप वाईट वाटायचं. पण आता मला त्या गोष्टींची सवय झाली आहे. ज्यांच्याकडे माझ्या प्रश्नांचं उत्तर नाही आणि माझ्या तर्काला प्रतिवाद करत येत नाही, ते टीका करून मोकळे होतात. आपल्या समाजाचं किती ध्रुवीकरण झालंय, हेच यातून सिद्ध होतं.”