लग्नाचं निमंत्रण द्यालोय… यायला लागतंय; ही लग्नपत्रिका का होतेय व्हायरलं?

नवरदेव आणि नवरीच्या डिझायनर कपड्यांपासून ते थेट चार पाच दिवस चालेल अश्या लग्नाचे नियोजन केले जाते.

लग्नाचं निमंत्रण द्यालोय... यायला लागतंय; ही लग्नपत्रिका का होतेय व्हायरलं?
| Updated on: Nov 23, 2022 | 5:50 PM

मुंबई : लग्न म्हटले की, थाटच न्यारा असतो. प्रत्येक मुलगा आणि मुलगी आपल्या लग्नाची स्वप्ने रंगवतात. इतरांपेक्षा आपले लग्न हटके व्हावे, यासाठी काही तरी हटके केले जाते. हल्ली तर लग्नांमध्ये पैशांची भरमसाठ उधळण केली जाते. नवरदेव आणि नवरीच्या डिझायनर कपड्यांपासून ते थेट चार पाच दिवस चालेल अश्या लग्नाचे नियोजन केले जाते. हळद, मेहंदी, संगीत आणि शेवटी लग्न असा कार्यक्रम आखला जातो. इतकेच नाही तर आजकाल प्री-वेडिंग शूट मोठ्या प्रमाणात केले जाते आणि लग्नाच्या आठ दिवसा अगोदर एक एक फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला जातो.

पूर्वीसारखे एका दिवसामध्ये लग्न करण्याची प्रथा तर आता बंदच होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, यासर्व प्रकाराला कोरोनामध्ये मोठा आळा नक्कीच बसला होता. कोरोनाच्या काळामध्ये अगदी कमी लोकांमध्ये लग्न करण्याचा नियम होता. मात्र, परत एकदा लग्न धुमधडाक्यात करण्यास सुरूवात झालीये.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून सोशल मीडियावर एक लग्नपत्रिका तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या लग्नपत्रिकेची खास बात म्हणजे या पत्रिकेमध्ये अस्सल कोल्हापुरी भाषा ही वापरण्यात आलीये. अस्सल कोल्हापुरी भाषा कशाला म्हणतात हे या पत्रिकेमधून दिसत आहे.

सोशल मीडियावर सुरूवातीला अनेकांना वाटले की, ही लग्नपत्रिका फेक आहे आणि कोणीतरी फक्त आणि फक्त प्रसिध्दी मिळवण्यासाठी ही व्हायरल केलीये. मात्र, आता हे स्पष्ट झाले आहे की, ही पत्रिका फेक नसून ही खरोखरच्याच लग्नाची पत्रिका आहे.

ही लग्नपत्रिका दुसरी तिसरी कोणाची नसून प्रसिध्द आर.जे सुमितची आहे. सुमित त्याच्या कोल्हापुरी भाष्येसाठी ओळखला जातो. सुमितचे लग्न श्वेता हिच्यासोबत होणार असून रविवारी 27 नोव्हेंबरला हे लग्न होणार असून लग्नाला येताना आहेर आणू नका, असेही या पत्रिकेमध्ये लिहिण्यात आले आहे.

विशेष बाब म्हणजे ही लग्नपत्रिका स्वत: सुमितने लिहिली असल्याचे सांगितले जात आहे. सुमितच्या लग्नाची ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. सुमितच्या या खास लग्नपत्रिकेची चर्चा सुरू आहे.