
मुंबई | 22 जानेवारी 2024 : बॉलिवूडचा नवाब, अभिनेता सैफ अली खान याच्या प्रकृतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. सैफ अली खान याला आज सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सैफची पत्नी करीना कपूर खान ही देखील आपल्या पतीसोबत रुग्णालयात उपस्थित आहे. सैफला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सैफला नेमकं काय झालं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सर्वांकडून सैफ लवकर बरा व्हावा, अशी प्रार्थना केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खान याच्या गुडघे आणि खांद्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला आज सकाळी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सैफच्या गुडघ्याची सर्जरी पार पडली आहे. यावेळी करीना आपल्या पतीसोबत रुग्णालयात आहे.
सैफ अली खानची तब्येत आता चांगली आहे. खरंतर त्याच्या गुडघ्यावर आज अचानक सर्जरी करण्यात आलेली नाही. गेल्या अनेक दिवसांपासून सैफला गुडघेदुखीचा त्रास सुरु होता. त्यानंतर आज त्याच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्याचं निश्चित करण्यात आलं. यात घाबरण्यासारखं काही नाही. सैफ अतिशय ठीक आहे आणि लवकरच सैफ आधीसारखा चांगल्याप्रकारे चालायला लागणार आहे.
सैफ अली खान जखमी होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीदेखील एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सैफ जखमी झाला आहे. सैफ 2016 मध्ये रंगून चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी जखमी झाला होता. त्याच्या अंगठ्याला जखम लागली होती. त्यानंतर सर्जरी झाली होती.
सैफ अली खान सध्या 53 वर्षांचा आहे. त्याचे देशभरात लाखो चाहते आहे. ‘सॅक्रेड गेम्स’ वेबसीरीजमध्ये त्याने केलेल्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं होतं. तसेच तो नुकताच ‘आदिपुरुष’ चित्रपटात झळकला होता. तसेच येत्या काळात त्याचे अनेक चित्रपट बघायला मिळणार आहेत. एवढंच नाही तर तो एका तेलगू चित्रपटातही दिसणार आहे. याशिवाय सैफचा ‘गो गोवा गोन’ हा चित्रपटही आगामी काळात येणार असल्याची माहिती आहे.