छावा पाहिला नि पसरली अफवा, औरंगजेबाचा खजिना लुटण्यासाठी किल्ल्यावर तुफान गर्दी; हजारो लोकांच्या हाती फावडे आणि कुदळी, सापडले का काही?

Burhanpur Asirgarh Fort : छावा चित्रपट कलेक्शनचे रेकॉर्ड मागून रेकॉर्ड मोडत असताना आता एक जबरदस्त बातमी समोर आली आहे. मुघल साम्राज्याचे टाकसाळ असलेल्या बुऱ्हाणपूर येथील औरंगजेबाचा खजिना लुटण्यासाठी किल्ल्यावर तुफान गर्दी झाली आहे.

छावा पाहिला नि पसरली अफवा, औरंगजेबाचा खजिना लुटण्यासाठी किल्ल्यावर तुफान गर्दी; हजारो लोकांच्या हाती फावडे आणि कुदळी, सापडले का काही?
असिरगड किल्ला परिसरात खजिन्यासाठी खोदकाम
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 08, 2025 | 9:31 AM

छावा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमावला आहे. हा सिनेमा कलेक्शनचे रेकॉर्ड मागून रेकॉर्ड तोडत आहे. त्याचवेळी एक हटके बातमी समोर येत आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलांचा खजिना लुटला होता. नेमका हाच धागा पकडून एक आवई उठली आणि औरंगजेबाचा खजिना लुटण्यासाठी हजारो नागरीक बुऱ्हाणपूर येथील किल्ल्यावर दाखल झाले. त्यांच्या हातात फावडं आणि कुदळ आहे. काहींकडे तर तेट मेटल डिटेकटर आहेत. त्या आधारे रात्रंदिवस खोदकाम सुरू आहे.

असिरगडच्या किल्ल्यावर हजारो नागरिकांची चढाई

बुऱ्हाणपूरजवळील असिरगडच्या किल्ल्यावर हजारो नागरिकांनी चढाई केली आहे. या किल्ला परिसरातील मोठी जमीन खोदण्यात आली आहे. या भागात यापूर्वी मुघल कालीन सोन्याची नाणी सुद्धा सापडली होती. त्यातच छावा चित्रपटात मराठ्यांनी बऱ्हाणपूर लुटल्याचे दाखवण्यात आले. त्यानंतर एक अफवा पसरली की औरंगजेबाचा खजिना याच परिसरात लपवून ठेवण्यात आला आहे. त्यानंतर हा खजिना लुटण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून हजारो स्त्री-पुरुषांनी किल्ला आणि परिसरात तळ ठोकला आहे.

नेमकं काय घडलं?

बुऱ्हाणपूर शहरापासून 18 किमीवर असिरगड किल्ल्याजवळून राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करण्यात येत आहे. त्यासाठी खोदकाम सुरू आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी एका बांधकाम कंपनीने खोदलेली माती ही एका व्यक्तीच्या शेतात टाकली होती. त्यात काही कामगारांना धातुची नाणी सापडली. तर अनेकांनी छावा चित्रपटातील बुऱ्हाणपूर लुटीचा संदर्भ देत या ठिकाणी औरंगजेबाचा खजिना दडल्याची अफवा पसरवली. त्याचा जो व्हायचा तो परिणाम झाला.

हा खजिना काढण्यासाठी असिरगड येथीलच नाही तर आजुबाजूच्या लोकांनी किल्ला परिसर आणि राष्ट्रीय महामार्गा लगतच्या शेतात खोदकाम सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे या नागरिकांकडे मेटल डिटेक्टर सुद्धा आहेत. त्यातील काही लोकांना नाणी सापडल्याचा दावा करण्यात येत आहे.

मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर ही मुघल छावणी होती. ते दक्षिण आणि उत्तर भारत जोडणारे मुख्य शहर होते. तर सागरी मार्गाने येणाऱ्या वस्तू या बुऱ्हाणपूर मार्गेच दिल्लीकडे जात होत्या. तर या शहरात मुघल नाण्यांची टाकसाळ सुद्धा होती. देशातील विविध मोहिमानंतर ज्यावेळी सैनिक या छावणीवर येत, त्यावेळी ते आजूबाजूच्या शेतात त्यांच्या लुटीचा माल खड्डा खोदून लपवून ठेवत असा दावा आहे. त्यामुळेच आता या परिसरात लोक खोदकाम करत आहेत.