संत्या, तू या गोष्टी..; संतोष जुवेकरच्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच विकी कौशलने दिली प्रतिक्रिया

'छावा' या चित्रपटात भूमिका साकारल्यानंतर अभिनेता संतोष जुवेकरने एका मुलाखतीत अक्षय खन्नाविषयी वक्तव्य केलं होतं. सेटवर मी त्याच्याशी बोललोच नाही, असं तो म्हणाला होता. त्यावरून त्याला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. यावर आता विकी कौशलने पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.

संत्या, तू या गोष्टी..; संतोष जुवेकरच्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच विकी कौशलने दिली प्रतिक्रिया
Vicky Kaushal and Santosh Juvekar
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 18, 2025 | 8:40 AM

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरने रायाजींची भूमिका साकारली होती. या चित्रपटानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत संतोषने सेटवर औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अभिनेता अक्षय खन्नाशी बोललोच नाही, असं वक्तव्य केलं होतं. यावरून त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. या ट्रोलिंगवर खुद्द संतोषने स्वत:ची बाजू मांडली होती. त्यानंतर आता या टीकेवर पहिल्यांदाच चित्रपटातील मुख्य अभिनेता विकी कौशलची प्रतिक्रिया समोर आली आहे. नुकतंच ‘छावा’च्या यशानिमित्त जंगी सेलिब्रेशनचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी लक्ष्मण उतेकर आणि विकी कौशल यांची संतोषने भेट घेतली.

विकीची प्रतिक्रिया

‘झेन एंटरटेन्मेंट’ला दिलेल्या मुलाखतीत संतोष म्हणाला, “दोघंही मला भेटून हसले. मला विकी म्हणाला की, तू तर माझ्यापेक्षाही जास्त लोकप्रिय झाला आहेत. संत्या हा विषय सोडून दे. त्याबद्दल फार विचार करू नकोस. तू माणूस म्हणून कसा आहेस हे तुझ्या जवळच्या लोकांना माहीत आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल तू विचार कर. ट्रोलर्सचा फार विचार करू नकोस आणि त्यांना उत्तरही देत बसू नकोस. जर तू उत्तर दिलंस, तर ते आणखीन बोलणार. ते तुझ्या प्रतिक्रियेची वाटच बघत बसणार, त्यापेक्षा तू शांत राहा.”

संतोषच्या कुटुंबीयांनी काय म्हटलं?

या मुलाखतीत संतोषने पुढे सांगितलं, “माझ्या एका वक्तव्यामुळे मला खूप ट्रोल करण्यात आलं. त्या ट्रोलिंगनंतर आई मला म्हणाली की, हे काय होतंय? त्यांना तुझ्याबद्दल माहीत नाही का? तेव्हा मी आई-वडिलांनाही समजावून सांगितलं की, तुम्ही याकडे फार लक्ष देऊ नका. मी स्वत: याचा विचार करत नाही. त्यामुळे तुम्हीसुद्धा करू नका. आपली विचार करण्याची जशी पद्धत आहे किंवा ज्या दृष्टीकोनातून आपण एखाद्या गोष्टीकडे बघतो, त्याच दृष्टीकोनातून आपल्या घरचे करतीलच असं नाही. स्पष्ट सांगायचं झाल्यास, मला आता त्या गोष्टींमुळे काहीच फरक पडत नाही. पण आपल्या कुटुंबीयांना फरक पडतो. ट्रोल करणाऱ्या माणसांसोबत कधी असं झालं आणि त्या सगळ्याचा त्रास त्यांच्या कुटुंबीयांना झाला, तर परिस्थिती कशी असेल, याचा त्यांनी एकदा नीट विचार करावा.”

“छावासारख्या चित्रपटात मला भूमिका साकारायची संधी मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी आणि आनंदाची बाब आहे. भूमिका कितीही लहान असली तरी ती माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. मी माझ्या आनंदात असताना त्यावर कोणीतरी विरजण टाकलं. सुरुवातीला मला त्या गोष्टींचा त्रास झाला, पण आता मी त्या मनाला लावून घेत नाही”, असं संतोषने स्पष्ट केलं.

संतोष जुवेकर कशामुळे झाला ट्रोल?

‘छावा’ या चित्रपटाच्या सेटवर काम करण्याचा अनुभव सांगताना संतोष जुवेकर एका मुलाखतीत म्हणाला होता, “चित्रपटात ज्यांनी मुघलांच्या भूमिका साकारल्या आहेत, त्या कोणाशीच मी बोललो नाही. औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नाच्या काही सीन्सचं शूटिंग सुरू होतं, तेव्हा मी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांना भेटायला गेलो होतो. मी सरांना भेटलो आणि निघालो. त्यांच्या बाजूला अक्षय खन्ना बसला होता. पण मी त्याच्याकडे बघितलंच नाही. माझा त्याच्यावर काही वैयक्तिक राग नाही. पण मला त्याच्याशी बोलावंसं वाटलं नाही.”