“महाराजांबद्दलचे गढूळ लिखाण पुसायचं होतं?”, शिर्केंच्या वंशांच्या आक्षेपानंतर ‘छावा’ दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांची माफी

छावा चित्रपटातील काही प्रसंगांवर गणोजी शिर्के यांच्या वंशजांनी आक्षेप घेतल्यानंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी माफी मागितली आहे. शिर्के कुटुंबीयांनी चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या वधात शिर्के बंधूंची भूमिका दाखवल्यावरून नाराजी व्यक्त केली होती. उतेकरांनी काही महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट करत त्यांची माफीही मागितली आहे.

महाराजांबद्दलचे गढूळ लिखाण पुसायचं होतं?, शिर्केंच्या वंशांच्या आक्षेपानंतर छावा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांची माफी
| Updated on: Feb 22, 2025 | 7:05 PM

छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित असलेला छावा चित्रपट सध्या तुफान गाजतोय. या चित्रपटाच्या निमित्तानं छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर तसेच त्यांची शौर्यगाथा सांगणारा हा चित्रपट आहे. रिलीजनंतर तर चित्रपटाने तुफान कमाई केली आहे. मात्र आता या चित्रपटाच्या रिलीजनंतर एक मुद्दा उपस्थित झाला आहे. चित्रपटातील काही प्रसंगावर गणोजी शिर्के यांच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेतला.

आक्षेप का घेण्यात आला?

छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर छत्रपती संभाजीराजेंचा घात गणोजी राजे शिर्के आणि त्यांच्या भावाने केल्याचं दाखवण्यात आलं. मात्र ते खरोखरच तसं आहे का असा प्रश्न उपस्थित करत इतिहासात त्याबाबत काय पुरावे आहेत? खरोखरच शिर्के बंधूमुळे छत्रपती संभाजी राजेंचा घात झाला होता का? याबाबत आशिर्केंचे वंशजांनी आक्षेप घेतला होता.

लक्ष्मण उतेकरांनी मागितली माफी

पुण्यात शुक्रवारी म्हणजे 21 फेब्रुवारी रोजी शिर्के कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि छावा कादंबरीच्या प्रकाशकांना पुरावे दाखवण्याची नोटीस बजावली होती. दिग्दर्शक उतेकर यांनी उत्तर द्यावं अन्यथा महाराष्ट्रात त्यांना फिरु देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर आता लक्ष्मण उतेकरांनी याबबात स्पष्टिकरण देत त्यांना दुखावण्याचा हेतू नसल्याचं म्हणत त्यांची माफी मागितली आहे.

“चित्रपटामध्ये मी त्यांचं नावही घेतलेलं नाही”

शिर्के कुटुंबीयांच्या आक्षेपांना दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी उत्तर दिलं आहे. उतेकरांनी म्हटलं आहे की,” छावा चित्रपट हा शिवाजी सावंत यांनी लिहिलेल्या ‘छावा’ या कादंबरीवर आधारित आहे. कादंबरीत गणोजी शिर्के, कानोजी शिर्के, शिरकाण गावचे त्यांचं कुलदैवत कुठलं या सर्व गोष्टींचा उल्लेख आहे. त्याचबरोबर मी चुकीचा नसेन तर महाराजांवर जी टीव्ही मालिका आली होती त्यामध्येही अगदी तसंच नावासकट, गावासकट दाखवलं आहे. पण या चित्रपटामध्ये मी त्यांचं नावही घेतलेलं नाही. गावही दाखवलेलं नाही. गणोजी आणि काणोजी या एकेरी नावानं त्यांचा चित्रपटात उल्लेख केला आहे. त्यांचं आडनाव अजिबात दाखवलेलं नाही. त्यांचं गाव कोणतं हे अजिबात दाखवलेलं नाही” ” असं म्हणतं उतेकरांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे.

तसेच ते पुढे म्हणाले, ” हा विषय पैसे कमावण्यासाठी नव्हताच. पैसे कमावण्यासाठी मी इतका मोठा धोका का घेईल? इतका वादग्रस्त विषय मी का घेईल? राजे काय होते हे जगाला कळावं यासाठी प्रामाणिक केलेला हा प्रयत्न होता. असा खुलासा उतेकर यांनी केला आहे.

“सर्वप्रथम माफी मागतो…”

दरम्यान यानंतर उतेकरांनी सर्व मुद्द्यांवर स्पष्टीकरण देत त्यांची माफी मागितली. ते म्हणाले की,” आदरणीय भूषणजी, सुरुवातीला सॉरी, कारण मी तुमचा काल फोन उचलला नाही. कारण नेटवर्क इश्यूमुळे शक्य झालं नाही. मी तुमची पत्रकार परिषद पाहिली आणि हा मेसेज वाचला. तुमच्या नकळत भावना दुखावल्या असतील तर मी तुमची सर्वप्रथम माफी मागतो.” अंसं म्हणत त्यांनी माफी मागितली.

छावा कादंबरीवरून घेतली चित्रपटाची कथा

तसेच पुढे ते म्हणाले, “सर, सिनेमाच्या सुरुवातीला एक डिस्क्लेमर येतो आणि त्यामध्ये लिहिलं आहे की हा चित्रपट पूर्णत: छावा या कादंबरीवर आधारित आहे. ती कादंबरी शिवाजी सावंत यांनी लिहिली होती. या चित्रपटाची कथा, पटकथा, हे सर्व आम्ही छावामध्ये जसं लिहिलं आहे तसंच रंगवण्याचा प्रयत्न केला आहे. कादंबरी शब्दांनी रंगवली जाते आणि चित्रपट लोकांना दाखवला जातो. पण, माहिती तीच असते. मी त्यामध्ये लेखक आणि दिग्दर्शक म्हणून काहीही ट्विटस्ट केलं नाही. मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. त्यामुळे मी ती खबरदारी नक्की घेतली आहे.” असं म्हणत त्यांना त्यांचा मुद्दा मांडला.

“छत्रपती संभाजी महाराजांवर असलेलं गढूळ लिखाण पुसण्याचा प्रयत्न”

उतेकर पुढे म्हणाले “तुमचे बंधू डॉ. राजेशिर्के हे तर माझे मित्र आहेत. या चित्रपटाचा उद्देश कुणाच्या भावना दुखवण्याच्या नव्हत्या. पैसे कमावण्यासाठी मला हा चित्रपट बनवण्याची गरजच नव्हती. माझ्याकडे पैसे कमावण्यासाठी इतर भरपूर विषय होते. छत्रपती संभाजी महाराज काय होते हे जगाला कळावं म्हणून आमच्या टीमनं चार वर्ष मेहनत करुन हा चित्रपट बनवला आहे. छत्रपती संभाजी महाराजांवर किती गढूळ लिखाण आहे हे तुम्हाला माहिती आहे. ते पुसण्याचा हा प्रयत्न होता. आपले राजे काय होते हे बच्चा-बच्चाला कळावं हा एक प्रयत्न होता. त्यामुळे पुन्हा एकदा तुमचं मन नकळत दुखावलं असेल तर माफी मागतो. पण, चित्रपटात कुठेही शिर्के या आडनावाचा उल्लेख झालेला नाही. त्यांच्या गावाचा उल्लेख नाही.” असं म्हणतं त्यांनी मनापासून शिर्के वंशजांची माफी मागितली आणि त्यांचा हेतू हा फक्त छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा एवढाच होता हे स्पष्ट केलं.