
अभिनेत्री दीपिका कक्करला स्टेज 2 कॅन्सर असून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शोएब इब्राहिमने नुकतीच त्याची पत्नी दीपिका कक्करच्या शस्त्रक्रियेबद्दल चाहत्यांना माहिती दिली होती. तिची शस्त्रक्रिया 14 तास चालली. शोएबने आता त्याच्या व्लॉगवर शस्त्रक्रियेबद्दल आणि तिच्या आरोग्याबद्दल अपडेट पोस्ट केली आहे. दीपिकासाठी प्रार्थना केल्याबद्दल त्याने चाहत्यांचे आभारही मानले. शोएबने सांगितले की दीपिका आयसीयूमधून बाहेर आली आहे.
यकृताचा एक छोटासा भाग कापावा लागला
शोएब पुढे म्हणाला, ‘डॉक्टरांनी मला आश्वासन दिले की जर ते अपडेटसाठी बाहेर आले नाहीत तर शस्त्रक्रिया व्यवस्थित सुरू आहे आणि ती पूर्णपणे बरी होईल.’ शोएबने सांगितले की दीपिकाच्या पित्ताशयात एक दगड होता जो शस्त्रक्रियेदरम्यान काढून टाकण्यात आला, आणि ट्यूमर कर्करोगाचा असल्याने त्यांना यकृताचा एक छोटासा भागही कापावा लागला.’ अशी धक्कादायक अपडेट शोएबने दिली आहे.
दीपिकाची प्रकृती आता कशी आहे?
शोएब इब्राहिमने पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, ‘ ईद अल अधा आहे आणि आज इतक्या शुभ दिवशी दीपिका आयसीयूमधून बाहेर आली आहे. ती आयसीयूमधून बाहेर आली आहे आणि आमच्यासोबत आहे याबद्दल मी आभारी आहे. ती तीन दिवस आयसीयूमध्ये राहिली आणि शस्त्रक्रियेनंतर तिची प्रकृती सुधारत आहे. शस्त्रक्रिया मोठी असल्याने ती काही दिवस हॉस्पिटलमध्येच राहणार आहे. ती 14 तास ओटीमध्ये होती.’
इतकी गंभीर शस्त्रक्रिया पाहिली नव्हती
तो पुढे म्हणाला, ‘डॉक्टरांनी आम्हाला सांगितले होते की ही एक लांब शस्त्रक्रिया असेल, त्यामुळे आम्ही सर्वजण काळजीत होतो. तिला सकाळी १ वाजता दाखल करण्यात आले आणि रात्री 11.30 वाजता दीपिका ओटीमधून बाहेर आली. तिला आयसीयूमध्ये हलवण्यात आले तेव्हा मी तिला भेटलो. संध्याकाळी ६-७ वाजता, ओटीकडून कोणतीही अपडेट न मिळाल्याने आम्ही सर्वजण घाबरलो होतो कारण आम्ही कधीही इतकी गंभीर शस्त्रक्रिया पाहिली नव्हती.’
डॉक्टरांनी शोएबला काय सांगितले?
शोएबने खुलासा केला की, ‘डॉक्टरांनी आम्हाला सांगितले होते की यकृत हा एक असा अवयव आहे जो कालांतराने स्वतःहून बरा होतो. त्यामुळे त्यावर ताण येण्याची गरज नाही पण आपण सावधगिरी बाळगली पाहिजे आणि चांगली काळजी घेतली पाहिजे.’