Deepika Padukone: 10% नफा मागून कथाच लीक केली..; दीपिका पादुकोणवर निर्मात्यांचा मोठा आरोप
Deepika Padukone: अभिनेत्री दीपिका पादुकोणवर 'स्पिरीट' या चित्रपटाच्या निर्मात्यांनी मोठा आरोप केला आहे. चित्रपटाच्या नफ्यातील दहा टक्के वाटा मागितला आणि नंतर कथाच लीक केली, असा आरोप त्यांनी केला आहे.

संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘स्पिरीट’ या चित्रपटाचा वाद अद्याप शमला नाही. सुरुवातीला अभिनेत्री दीपिका पादुकोण यामध्ये मुख्य भूमिका साकारणार होती. मात्र त्यासाठी तिने निर्मात्यांसमोर काही अटी ठेवल्या होत्या. आठ तासांची शिफ्ट आणि वाढीव मानधन या अटी निर्मात्यांनी नाकारल्यानंतर दीपिकाच्या हातून हा मोठा प्रोजेक्ट गेल्याची चर्चा होती. आता दिग्दर्शक संदीपचा भाऊ प्रणय रेड्डीने केलेल्या नव्या दाव्यांनंतर या वादाला वेगळंच वळण मिळालं आहे. प्रणयने सांगितलं की, “त्या अभिनेत्रीसोबत दीड वर्ष चर्चा सुरू होती, पण तिने मानधनाव्यतिरिक्त चित्रपटाच्या एकूण नफ्यातील 10 टक्के वाटा मागितला होता. चित्रपटाचा बजेट पाहता हे अजिबातच शक्य नव्हतं.”
एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत प्रणय रेड्डी वांगा यांनी ‘स्पिरीट’ या चित्रपटाच्या वादावर भाष्य केलं. ते म्हणाले, “हा वाद फक्त पाच ते सहा कोटी रुपयांच्या अधिक मानधनापुरता मर्यादित नव्हता. दीपिका चित्रपटाच्या नफ्यात 10% वाटा मागत होती. त्यानंतर लवकरच गोष्टी हाताबाहेर गेल्या. ती काहीही मागू शकते. जर आम्ही द्यायला तयार असू, तर आम्ही देऊ शकतो. पण चित्रपटाचं बजेटही आम्हाला मान्य असायला हवं. हे प्रकरण इथेच संपलं नाही. जेव्हा आम्ही इतर पर्यायांचा विचार करू लागलो, तेव्हा चित्रपटाची कथा आणि पात्रांचा तपशील माध्यमांना लीक झाला.”
“आम्हाला हे सर्व जमत नसल्याने आम्ही इतर पर्याय शोधू लागलो होतो. जेव्हा आम्ही पर्याय शोधायला घेतले, तेव्हा तिने सगळं काही बाहेर सांगायला सुरुवात केली. टीमने दीपिकासोबत चित्रपटाची कथा आणि तिच्या भूमिकेवर वर्षभरापेक्षा जास्त काळ चर्चा केली होती. त्या संभाषणांचे तपशील सार्वजनिक झाल्यामुळे टीम संतापली होती. आम्ही तिच्यासोबत कथेबद्दल आणि पात्राबद्दल चर्चा केली होती. अंतर्गत चर्चा केलेल्या गोष्टी बाहेर यायला नकोत, पण तिने ते सर्व बाहेर काढलं”, असा मोठा आरोप प्रणय रेड्डी यांनी केला.
याविषयी मे महिन्यात संदीप रेड्डी वांगानेही एक्स (ट्विटर) अकाऊंटवर संतप्त पोस्ट लिहिली होती. दीपिकाचं नाव न घेता त्याने तिच्यावर निशाणा साधला होता.
संदीप रेड्डी वांगाची पोस्ट-
‘जेव्हा मी एखाद्या अभिनेत्याला/ अभिनेत्रीला माझ्या चित्रपटाची कथा सांगतो, तेव्हा त्याच्यावर माझा 100 टक्के विश्वास असतो. आमच्यात न बोलता एक नॉन-डिस्क्लोजर (NDA) करार असतो. पण असं करून तुम्ही नेमके कोण आहात हेच उघड केलं आहे. एका तरुण अभिनेत्याला कमी लेखणं आणि माझी कथा त्याच्याकडून काढून घेणं? तुमच्या मते हीच तुमच्या फेमिनिझमची व्याख्या आहे का? एक दिग्दर्शक म्हणून मी माझ्या कलेमागे अनेक वर्षांची मेहनत घेतली आहे. माझ्यासाठी फिल्ममेकिंग म्हणजे सर्वस्व आहे. पण तुम्हाला ते समजलं नाही. तुम्हाला ते कधी समजणारही नाही. एक काम करा, पुढच्या वेळ संपूर्ण कथाच सगळ्यांना सांगून टाका. कारण मला त्याने जराही फरक पडत नाही’, असं लिहित त्याने #DirtyPRGames हा हॅशटॅग जोडला होता.
When I narrate a story to an actor, I place 100% faith. There is an unsaid NDA(Non Disclosure Agreement) between us. But by doing this, You’ve ‘DISCLOSED’ the person that you are….
Putting down a Younger actor and ousting my story? Is this what your feminism stands for ? As a…— Sandeep Reddy Vanga (@imvangasandeep) May 26, 2025
या पोस्टच्या अखेरीस संदीपने एक म्हणसुद्धा लिहिली आहे. ‘मला ही म्हण खूप आवडते- खुंदक में बिल्ली खंबा नोचे’, असं त्याने म्हटलंय. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याचा राग किंवा चीड दुसऱ्या व्यक्तीवर असतो, पण त्याच्यावर थेट राग काढता न आल्यामुळे ती व्यक्ती निरपराध किंवा संबंध नसलेल्या व्यक्तीवर, वस्तूवर आपला राग काढते. अखेर ‘स्पिरीट’ या चित्रपटासाठी दीपिकाच्या जागी तृप्ती डिमरीची निवड करण्यात आली.