
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाचा सध्या सर्वत्र बोलबाला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात कमाईचा 700 कोटींचा टप्पा पार केला आहे. यावरूनच या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये किती क्रेझ आहे, हे सहज लक्षात येतं. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या भारतातील एकूण कमाईच्या 35 टक्के वाटा हा एका महत्त्वपूर्ण राज्यातून येत आहे. पहिल्या आठवड्यात झालेल्या देशभरातील 454 कोटी रुपयांच्या एकूण कमाईत अंदाजे 185 कोटी रुपयांची कमाई फक्त या राज्यातून होत आहे. हे राज्य दुसरं तिसरं कोणतं नसून महाराष्ट्रच आहे. केवळ धुंरधरच नाही तर 2025 मध्ये प्रदर्शि झालेल्या मोठ्या चित्रपटांच्या भारतातील एकूण कमाईत महाराष्ट्राचा वाटा सुमारे एक-तृतीयांश राहिला आहे.
महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर या शहरांमध्ये ओपनिंग वीकेंडची कमाई जबरदस्त होत आहे. इतकंच नव्हे तर महाराष्ट्रात एखाद्या हिंदी चित्रपटाला अधिकाधिक प्रतिसाद मिळू लागला की आपोआप इतर भारतात त्याची क्रेझ निर्माण होऊ लागते. तगडी स्टारकास्ट, वास्तववादी मांडणी आणि प्रभावी कथानक यांच्या जोरावर धुरंधरने मुंबई-पुण्यात पहिल्या आठवड्यात मजबूत ओपनिंग नोंदवलं. बहुतांश ठिकाणी अजूनही या चित्रपटाचे शोज हाऊसफुल आहेत. माऊथ पब्लिसिटीमुळे या चित्रपटाच्या स्क्रीन्स इतर राज्यांमध्येही वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे धुरंधरच्या एकूण बॉक्स ऑफिस कमाई महाराष्ट्राचा वाटा निर्णायक आहे. असंच चित्र ‘छावा’, ‘कांतारा : चाप्टर वन’, ‘पुष्पा 2’ या चित्रपटांच्या वेळीही पहायला मिळालं.
‘धुरंधर’ या चित्रपटात रणवीर सिंह, अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल, राकेश बेदी, सारा अर्जुन, संजय दत्त यांच्या भूमिका आहेत. सोशल मीडियावरील एक वर्ग जरी या चित्रपटात दाखवलेल्या हिंसेला, सीन्सला विरोध करत असला तरी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत भारतात 480 आणि जगभरात तब्बल 730 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला आहे. रणवीर सिंहच्या करिअरमधील ही सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग नवीन वर्षात मार्च महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पहिला दिवस- 28 कोटी रुपये
दुसरा दिवस- 32 कोटी रुपये
तिसरा दिवस- 43 कोटी रुपये
चौथा दिवस- 23.25 कोटी रुपये
पाचवा दिवस- 27 कोटी रुपये
सहावा दिवस- 27 कोटी रुपये
सातवा दिवस- 27 कोटी रुपये
पहिल्या आठवड्याची एकूण कमाई- 207.25 कोटी रुपये
आठवा दिवस- 32.5कोटी रुपये
नऊवा दिवस- 53 कोटी रुपये
दहावा दिवस- 58 कोटी रुपये
अकरावा दिवस- 30.5 कोटी रुपये
बारावा दिवस- 30.5 कोटी रुपये
तेरावा दिवस- 25.5 कोटी रुपये
चौदावा दिवस- 23.25 कोटी रुपये
दुसऱ्या आठवड्यातील एकूण कमाई- 253.25 कोटी रुपये
पंधरावा दिवस- 22.50 कोटी रुपये
आतापर्यंतची एकूण कमाई- 483 कोटी रुपये