
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यापासून छप्परफाड कमाई करत आहे. या चित्रपटासमोर ‘किस किसको प्यार करूं 2’, ‘अवतार: फायर अँड ॲश’ आणि ‘तू मेरी मे तेरा मे तेरा तू मेरी’ यांनाही बॉक्स ऑफिसवर फारसं टिकता आलं नाही. थिएटरमध्ये स्क्रीन शेअरिंगच्या आणि वितरणाच्या बाबतीत ‘धुरंधर’ला अधिक पसंती दिली जात होती. परंतु आता नवीन वर्षात ‘धुरंधर’ला मोठा फटका बसला आहे. कारण या चित्रपटाचे थेट 50 टक्के शोज हटवण्यात आले आहेत, तेसुद्धा एका नव्या स्टारकिडच्या चित्रपटामुळे. या स्टारकिडच्या पदार्पणाचा चित्रपट 1 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित झाला. त्यानंतर ‘धुरंधर’चे शोज कमी करण्यात आले.
हा स्टारकिड दुसरा-तिसरा कोणी नसून अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आहे. अगस्त्यचा ‘इक्कीस’ हा चित्रपट नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट आहे. ‘इक्किस’ आणि ‘धुरंधर’चे वितरक तसंच निर्मातेसुद्धा एकच आहेत. त्यामुळे रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या ‘धुरंधर’चे शोज जरी कमी केले तरी त्यांना काहीच आक्षेप नाही. कारण या चित्रपटाने आधीच चांगली कमाई केली आहे. आता ‘इक्कीस’ला ती संधी मिळावी यासाठी असा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय. ‘धुरंधर’ला प्रदर्शित होऊन पाच आठवडे पूर्ण झाल्याने ‘इक्कीस’साठी त्याचे शोज सध्या 30 ते 40 टक्क्यांनी हटवण्यात आले आहेत.
‘बॉलिवूड हंगामा’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, दोन स्क्रीन्स असलेल्या थिएटर्समध्ये त्यांनी चित्रपटाचे 4 शोज, तीन स्क्रीन्स असलेल्या थिएटर्समध्ये 6 शोज आणि 4 स्क्रीन्स असलेल्या मल्टीप्लेक्सेसमध्ये त्यांनी 8 शोज ठेवण्यास सांगितले आहेत. ज्याठिकाणी पाच आणि त्यापेक्षा अधिक स्क्रीन्स उपलब्ध असतील, तिथे दहापेक्षा जास्त शोज लावण्याची विनंती करण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर सिंगल स्क्रीन, 2 स्क्रीन्स आणि 3 स्क्रीन्स असलेल्या थिएटर्समध्ये त्यांनी सकाळी लवकर शो न ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. कारण ‘इक्कीस’ हा एक असा चित्रपट आहे, जो कदाचित सकाळी लवकरच्या शोजसाठी प्रेक्षकांना आकर्षित करू शकणार नाही. माऊथ पब्लिसिटीने त्याचा प्रेक्षकवर्ग हळूहळू वाढत जाईल.
गेल्या आठवड्यात जिथे सिंगल स्क्रीन्सवर ‘धुरंधर’ सर्वाधिक दाखवलं जात होतं, तिथे आता ‘इक्कीस’चे शोज दिसणार आहेत. त्यामुळे अगस्त्यच्या या चित्रपटासाठी फोटा फायदा असेल. तर मुंबईसारख्या शहरात कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे यांच्या ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’ या चित्रपटापेक्षा ‘इक्कीस’चे शोज अधिक असतील.