
अभिनेता रणवीर सिंहच्या आगामी ‘धुरंधर’ या चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित झाला. मुंबईतील NMACC इथं या ट्रेलर लाँचचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य धरने संपूर्ण टीमचं कौतुक केलं. सर्व कलाकार आणि क्रू मेंबर्स यांनी कोणतीही तक्रार न करता जवळपास दीड वर्षं 16 ते 18 तास काम केल्याचं त्याने सांगितलं. परंतु याच वक्तव्यातून आदित्यने रणवीरची पत्नी आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणला अप्रत्यक्ष टोमणा मारल्याचं म्हटलं जात आहे. दीपिकाने फिल्म इंडस्ट्रीत 8 तासांच्या शिफ्टची मागणी केली होती. याच मागणीच्या वादामुळे तिने दोन मोठे प्रोजेक्ट्सही सोडल्याची चर्चा होती. इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी त्यावर विविध मतं मांडत आहेत.
आदित्य म्हणाला, “जवळपास पाच वर्षांच्या ब्रेकनंतर मी या चित्रपटाच्या कामाला सुरुवात केली होती. आतल्या प्रत्येक कलाकाराने प्रचंड मेहनत घेतली आहे. अभिनेत्यांपासून, सहकारी, एचओडी आणि स्पॉटदादांपर्यंत प्रत्येकाने आपलं सर्वस्व दिलं आहे. या चित्रपटासाठी जीव ओतून काम करायची भावना त्यांच्यात होती. आम्ही दीड वर्षापर्यंत दररोज 16 ते 18 तास काम करत होतो. पण एकानेही तक्रार केली नाही की, सर तुम्ही आमच्याकडून खूप काम करवून घेत आहात. प्रत्येकाने 100 टक्के मेहनत घेतली आहे.”
यावेळी रणवीर सिंहनेही आदित्यचं कौतुक केलं. “जेव्हा एखाद्या व्यक्तीचा उद्देश योग्य असतो तेव्हा सर्वकाही योग्यरित्या जुळून येतं आणि त्याचेच सर्वोत्तम परिणाम पहायला मिळतात. मीसुद्धा त्याच भावनेनं या प्रवासात उतरलो आणि समोर आलेल्या प्रत्येक आव्हानांचा सामना केला. आम्हाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आदित्य तिथे होताच. आम्ही दोघं जेव्हा एकमेकांना भेटलो, तेव्हा आयुष्याच्या एकसारख्याच टप्प्यावर होतो. त्याला मुलगा झाला आणि मला मुलगी झाली. आमच्या लोकांना, टीमला, कुटुंबीयांना आणि प्रेक्षकांना आमचा अभिमान वाटावा, असं काम आम्ही या चित्रपटासाठी केलंय.”
दीपिकाने सीएनबीसी-टीव्ही 18 ला दिलेल्या मुलाखतीत 8 तासांच्या शिफ्टचा मुद्दा उचलला होता. तिने बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या दुटप्पी भूमिकांवर टीकासुद्धा केली होती. “जर एक महिला असल्यामुळे ही गोष्ट दबाव टाकल्यासारखी वाटत असेल, तर असंच आहे. परंतु ही गोष्ट लपलेली नाही की भारतीय फिल्म इंडस्ट्रीत अनेक सुपरस्टार, पुरुष सुपरस्टार वर्षानुवर्षे 8 तासच काम करत आहेत आणि ही गोष्ट कधीच चर्चेत आली नाही. मी आता नाव घेऊ इच्छित नाही आणि त्या गोष्टीला महत्त्वही देऊ इच्छित नाही, परंतु ही सर्वसामान्य बाब आहे. सार्वजनिकरित्या अनेक अभिनेत्यांबद्दल लोकांना माहीत आहे की ते फक्त 8 तासच काम करतात. काही जण फक्त सोमवार ते शुक्रवार 8 तास काम करतात आणि वीकेंडला काम करत नाहीत”, असं तिने म्हटलं होतं.