Dino Morea : दिनो मोरियाला पोलिसांनी घेतलेलं ताब्यात, सहा तासांची चौकशी अन्…

Dino Morea Case Update : मिठी नदीचा गाळ काढण्याप्रकरणी दिनो मोरियाची सहा तास चौकशी झाली असून अभिनेत्याला अटक करण्यात आलेली नाही.

Dino Morea : दिनो मोरियाला पोलिसांनी घेतलेलं ताब्यात, सहा तासांची चौकशी अन्...
| Updated on: Oct 02, 2026 | 7:47 PM

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कथित घोटाळ्याप्रकरणी अभिनेता दिनो मोरियाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं. मात्र, आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.

मिठी नदीप्रकरणी दिनो मोरियाला अटक  नाही. पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून अभिनेत्याची सहा तास चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर दिनो मोरियाला सोडण्यात आलं आहे.

Loading...

प्रकरण काय आहे?

हे प्रकरण मुंबईतील मिठी नदीचा गाळ काढणे आणि तिचे पुनरुज्जीवन करण्यासाठी दिलेल्या कंत्राटांशी संबंधित आहे, ज्यात कथित आर्थिक अनियमितता उघडकीस आली आहे. कंत्राटे कशी देण्यात आली आणि पैसे कसे दिले गेले, यांसह कंत्राटदार, मध्यस्थ आणि पालिका अधिकाऱ्यांच्या कथित भूमिकेची तपास अधिकारी चौकशी करत आहेत. ईओडब्ल्यूने असा आरोप केला आहे की, या प्रकल्पामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेला (बीएमसी) ६५.५४ कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे.

 

तपासादरम्यान पोलिसांनी फोन रेकॉर्ड तपासले, ज्यातून या प्रकरणातील लोकांशी त्याचा संपर्क असल्याचे उघड झाले, तेव्हा दिनो मोरियाचं नाव समोर आलं. ईओडब्ल्यूने मे २०२५ मध्ये या अभिनेत्याची आणि त्याचा भाऊ, सँटिनो मोरिया, यांची चौकशी केली. तपास अधिकारी सँटिनोच्या ‘यूबीओ राइड्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीशी संबंधित आर्थिक व्यवहारांचीही तपासणी करत होते.

 

 या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या केतन कदमने हे पैसे हस्तांतरित केले होते. कदमला २०२५ मध्ये अटक करण्यात आली होती आणि त्याचा संबंध वोडर इंडिया एलएलपीशी आहे, जी गाळ काढण्याच्या कंत्राटांमध्ये गुंतलेली आहे. तपासकर्त्यांना असं आढळून आलं की, वोडर इंडिया एलएलपी आणि यूबीओ राइड्स या दोन्ही कंपन्या मुंबईतील वरळी येथील फेमस स्टुडिओजवळ एकाच पत्त्यावरून कार्यरत होत्या. कदम आणि मोरिया कुटुंब यांच्यातील कथित आर्थिक संबंधांचीही पोलीस चौकशी करत आहेत.

२०२४ मध्येही अटकसत्र झाले. नदीतील गाळ काढण्याच्या कामातील कथित अनियमिततेची चौकशी करण्यासाठी ईओडब्ल्यूने २०२४ मध्ये एक विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केलं. या प्रकरणात कदम आणि जयेश जोशी यांच्यासह अनेक जणांना अटक करण्यात आली आहे, तर कथित आर्थिक व्यवहार आणि नागरी कंत्राटांची चौकशी सुरू आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us