‘राजा शिवाजी’ बघण्याआधीच बाबा सोडून गेले..; रितेशच्या चित्रपटात काम केलेल्या अभिनेत्रीची खंत

'लाखात एक आमचा दादा' या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीने रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. परंतु तिचा हा चित्रपट तिचे बाबा पाहू शकले नसल्याची खंत अभिनेत्रीने बोलून दाखवली आहे.

राजा शिवाजी बघण्याआधीच बाबा सोडून गेले..; रितेशच्या चित्रपटात काम केलेल्या अभिनेत्रीची खंत
Disha Pardeshi
Image Credit source: Instagram
| Updated on: May 18, 2026 | 1:54 PM

अभिनेता रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटात मराठी आणि हिंदी कलाविश्वातील अनेक कलाकारांची फौज पहायला मिळतेय. खुद्द रितेशनेच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारल्या आहेत. त्याच्यासोबत या चित्रपटात जिनिलिया देशमुख, संजय दत्त, विद्या बालन, बोमन इराणी, फरदीन खान, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री यांसारख्या कलाकारांनी काम केलं आहे. या चित्रपटात संजय दत्त अफझल खानाच्या भूमिकेत असून अफझल बेगमची भूमिका अभिनेत्री दिशा परदेशीने साकारली आहे. तिच्या कामाचं सध्या सर्वत्र कौतुक आहे, परंतु आयुष्यातील एका सर्वांत महत्त्वाच्या व्यक्तीला तो चित्रपट पाहता आला नाही, याची खंत तिने बोलून दाखवली आहे.

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत दिशा म्हणाली, “बाबांनी माझा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट नाही पाहिला. ती एक छोटीशी खंत राहून गेली. आई आणि बिल्डिंगमधील मित्रमैत्रिणी हा चित्रपट बघायला गेले. आईने बाबांनाही विचारलं होतं, पण घरात आमचं छोटंसं एक पिल्लू (श्वान) आहे. हिला कोण सांभाळणार, असं म्हणत ते घरीच थांबले. तुम्ही जा, मी नंतर हा चित्रपट बघणार, असं त्यांनी सांगितलं. त्या संपूर्ण आठवड्यात मी विविध कामांमध्ये खूप व्यस्त होते. माझ्या डोक्यात असा विचार होता की, पुढच्या आठवड्यात मी बाबांना हा चित्रपट बघायला घेऊन जाईन. आम्ही दोघं पिक्चर बघू. कारण माझ्याहून जास्त हे एवढं मोठं स्वप्न माझ्या बाबांचं आहे. या इंडस्ट्रीत काम करण्यासाठी, टिकून राहण्यासाठी आई-बाबांनी मला आधीपासूनच खूप पाठिंबा दिला आहे. पण स्वप्न हे माझ्या बाबांचं होतं. पण शनिवारीच बाबा आम्हाला सोडून कायमचे गेले.”

“बाबा आधीपासूनच सर्वांना फोन करून सांगत होते की, ‘राजा शिवाजी’ या चित्रपटात माझी मुलगी आहे. त्यामुळे रिलीज झाल्यावर लगेच तो बघायला जा”, अशा शब्दांत दिशा पुढे व्यक्त झाली. दिशा परदेशी झी मराठी वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेतून घराघरात पोहोचली. यामध्ये तिने साकारलेली तुळजा ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. दरम्यान ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत असून गेल्या 17 दिवसांत या चित्रपटाच्या कमाईचा आकडा 85 कोटी रुपयांवर गेला आहे.

Follow Us