सर्वाइकल कॅन्सरने निधन झालेल्या अभिनेत्रीची शेवटची पोस्ट व्हायरल; तुम्हीही व्हाल भावूक!

| Updated on: Mar 09, 2024 | 8:18 AM

'झनक' या मालिकेत भूमिका साकारलेली अभिनेत्री डॉली सोहीचं शुक्रवारी सकाळी सर्वाइकल कॅन्सरने निधन झालं. सहा महिन्यांपूर्वीच तिला कॅन्सरचं निदान झालं होतं. दुर्दैवाची बाब म्हणजे डॉलीच्या काही तास आधी तिच्या बहिणीचंही काविळीने निधन झालं.

सर्वाइकल कॅन्सरने निधन झालेल्या अभिनेत्रीची शेवटची पोस्ट व्हायरल; तुम्हीही व्हाल भावूक!
Dolly Sohi
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 9 मार्च 2024 | शुक्रवारी सकाळी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून धक्कादायक बातमी समोर आली. अमनदीप सोही आणि डॉली सोही या दोघी बहिणींचं निधन झालं आहे. गुरुवारी रात्री टीव्ही अभिनेत्री अमनदीप सोहीच काविळीने निधन झालं. तर त्याच्या काही तासांनीच डॉली सोहीचेही प्राण गेले. गेल्या काही महिन्यांपासून डॉलीवर सर्वाइकल कॅन्सरचे उपचार सुरू होते. सहा महिन्यांआधी तिला कॅन्सरचं निदान झालं होतं. चौथ्या स्टेजवर असलेल्या कॅन्सरमुळे डॉली वाचू शकली नाही. डॉली आणि अमनदीप या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. डॉलीच्या निधनानंतर तिची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल होत आहे.

डॉलीने 20 फेब्रुवारी रोजी ही पोस्ट लिहिली होती. ‘प्रार्थना- जगातील सर्वांत मोठं वायरलेस कनेक्शन. एखाद्या चमत्कारासारखं हे काम करतं. म्हणून मला तुमच्या प्रार्थनांची गरज आहे’, असं तिने लिहिलं होतं. दुसरीकडे डॉलीची बहीण अमनदीपने इन्स्टाग्रामवर 22 फेब्रुवारी रोजी शेवटची पोस्ट शेअर केली होती. यामध्ये ती रुग्णालयात दाखल झाल्याचं पहायला मिळालं. अमनदीपने एक व्हिडीओ पोस्ट केला होता, त्यात तिची प्रकृती ठीक नसल्याचं दिसून येतंय.

हे सुद्धा वाचा

अमृतसरमध्ये जन्मलेल्या डॉली सोहीने ‘मेरी आशिकी तुम से ही’, ‘खूब लडी मर्दानी.. झांसी की रानी’, ‘हिटलर दीदी’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलंय. अखेरची ती ‘झनक’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. कॅन्सरवरील उपचार घेण्यासाठी काही दिवसांपूर्वीच मालिका सोडली होती. डॉलीने जवळपास दोन दशकं टीव्ही इंडस्ट्रीत काम केलंय. तिचं लग्न कॅनडामधील एनआयआर अवनीत धनोवाशी झालं होतं. मात्र आई झाल्यानंतर त्यांच्या वैवाहिक आयुष्यात काही समस्या निर्माण झाल्या होत्या. डॉली आणि धनोवा यांना एक मुलगी आहे.

काही दिवासंपूर्वी अभिनेत्री पूनम पांडेनं स्वत:च्या मृत्यूविषयी अफवा पसरवली होती. सर्वाइकल कॅन्सरबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी पूनम पांडेनं स्वत:च्याच निधनाची अफवा पसरवली होती. त्यावर डॉलीने संताप व्यक्त केला होता. “जे लोक अशा प्रकारच्या कॅन्सरशी झुंज देत आहेत, त्यांना ही गोष्ट पचवणंच खूप कठीण आहे. पूनमच्या निधनाबद्दल वाचलं तेव्हा माझ्या पायाखालची जमिनच सरकली होती”, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या होत्या.