घटस्फोटानंतर पूर्व पतीकडून दुसरं रिलेशनशिप जाहीर; ईशा देओल स्पष्टच म्हणाली..

ईशा देओलला घटस्फोट दिल्यानंतर तिचा पूर्व पती भरत तख्तानीने त्याचं नविन रिलेशनशिप जाहीर केलं. दुबईतील उद्योजिकाला तो डेट करतोय. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ईशा त्यांच्या नात्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली.

घटस्फोटानंतर पूर्व पतीकडून दुसरं रिलेशनशिप जाहीर; ईशा देओल स्पष्टच म्हणाली..
Esha Deol and Bharat Takhtani
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 08, 2025 | 9:40 AM

ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओलने काही महिन्यांपूर्वीच घटस्फोट जाहीर केला. त्यानंतर तिचा पूर्व पती भरत तख्तानी त्याच्या नव्या अफेअरमुळे चर्चेत आला आहे. दुबईतील उद्योजिका मेघना लखानीसोबत तो रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. ईशा आणि भरत यांनी 2012 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांना मिराया आणि राध्या या दोन मुली आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ईशा घटस्फोटानंतर मुलांच्या संगोपनाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली.

‘ममाराझी’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ईशा म्हणाली, “मला स्वत:ला ‘सिंगल मदर’ म्हणून विचार करायला आवडत नाही. कारण मी तशी वागत नाही आणि समोरच्यालाही माझ्यासोबत तसं वागू देत नाही. कधी कधी आयुष्यात काही गोष्टींमुळे तुमच्या भूमिका बदलतात. जर दोन व्यक्ती एकेकाळी एकमेकांसोबत कसे होते, याचं समीकरण काही गोष्टींबाबत जुळत नसेल, तर तुम्ही ती जबाबदारी स्वत:वर घेतली पाहिजे. खासकरून जेव्हा तुम्हाला मुलंबाळं असतात, तेव्हा तुम्हाला सामंजस्याने आणि परस्पर संमतीने निर्णय घ्यावे लागतात. दोन समजूतदार लोकांनी त्यातून योग्य मार्ग काढायला हवा. मुलांसाठी तुम्हाला एकत्र यावंच लागतं. भरत आणि मी हेच करतोय.”

2024 मध्ये ईशापासून विभक्त झाल्यानंतर भरतने काही दिवसांपूर्वी मेघना लखानीसोबतचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केला होता. ‘माझ्या कुटुंबात स्वागत आहे’ असं कॅप्शन देत आणि त्यावर हृदयाचा इमोजी पोस्ट करत त्याने हा फोटो अपलोड केला होता. भरतची ही पोस्ट लगेच सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि घटस्फोटानंतर तो त्याच्या आयुष्यात पुढे निघून गेल्याचं पहायला मिळालं.

ईशा आणि भरत हे लग्नाच्या 11 वर्षांनंतर विभक्त झाले. ईशा आणि भरत हे एकमेकांना लहानपणापासून ओळखायचे. त्यामुळे या दोघांमध्ये नेमकं कुठे बिनसलं, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा केला गेला, की दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर ईशा आणि भरत यांच्यात दुरावा निर्माण झाला. ईशाने स्वत:च्या तिच्या पुस्तकात याचा उल्लेख केला होता.