Falguni Pathak: “फालतू रिमिक्स का बनवता?”; फाल्गुनी पाठकने नेहाला सुनावलं

गाण्यांच्या रिमिक्सवरून फाल्गुनीचा नेहा कक्करला सल्ला

Falguni Pathak: फालतू रिमिक्स का बनवता?; फाल्गुनी पाठकने नेहाला सुनावलं
Falguni Pathak and Neha Kakkar
Image Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Sep 27, 2022 | 4:35 PM

मुंबई- गायिका फाल्गुनी पाठक (Falguni Pathak) आणि नेहा कक्कर (Neha Kakkar) यांच्यातील वाद काही थांबायचं नाव घेत नाहीये. फाल्गुनीच्या ‘मैंने पायल है छनकाई’ या गाण्याचा नेहाने रिमेक बनवला. ‘ओ सजना’ (O Sajna) असं या रिमेकचं नाव आहे. मात्र हा रिमेक नेटकऱ्यांना अजिबात आवडला नाही. फाल्गुनीचे चाहते एकीकडे नेहाला ट्रोल करत आहेत. तर दुसरीकडे स्वत: फाल्गुनीसुद्धा वारंवार नेहावर या रिमेकवरून निशाणा साधतेय. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत फाल्गुनीने नेहावरचा राग व्यक्त केला.

राण्यांच्या रिमिक्स बनवण्यावर माझा काहीच आक्षेप नाही, पण ते चांगल्या पद्धतीन केले जावेत, असं मत फाल्गुनीने मांडलं. फाल्गुनीच्या या गाण्यावरून नेहाला सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. चांगल्या जुन्या गाण्यांची वाट नको लावूस, असंच नेटकरी म्हणतायत.

‘मिर्ची प्लस’ला दिलेल्या मुलाखतीत फाल्गुनी म्हणाली, “गाण्यांचे रिमेक बनवा, पण चांगल्या पद्धतीने बनवा. सध्या रिमिक्सचा जमाना आहे. काही गाणी चांगली बनवली गेली आहेत. अशी गाणी आम्ही स्टेजवरसुद्धा गातो. रिमिक्स बनवताना त्या गाण्याची वाट लावू नका. तुम्ही फालतू रिमेक का बनवता?”

“मैंने पायल है छनकाई हे माझं गाणं 2000 मध्ये प्रदर्शित झालं होतं. आजसुद्धा हे गाणं ताजं आणि लोकप्रिय आहे. आजही मी ते गाणं गायलं तरी मला तितकंच प्रेम मिळतं. 2000 मध्ये माझ्यावर जेवढा कौतुकाचा वर्षाव झाला होता, तेवढात आजही होतो. त्याला रिक्रिएट करायचं असेल तर करा, त्यात वेगळे रिदम द्या, मॉडर्न टच द्या. पण चांगल्या प्रकारे रिमेक बनवा. मूळ गाण्याच्या सौंदर्याला नष्ट करू नका”, असं ती पुढे म्हणाली.

या वादाच्या पार्श्वभूमीवर सोनी टीव्हीने नेहा आणि फाल्गुनीच्या एपिसोडचा एक प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या प्रोमोमध्ये इंडियन आयडॉलच्या सेटवर नेहा कक्कर ही फाल्गुनीचं स्वागत करताना दिसतेय. त्यामुळे वादानंतर या दोघींचं पॅचअप झालं की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. तर काहींनी हा सगळा पब्लिसिटी स्टंट होता, असं म्हटलंय.  मात्र हा एपिसोड वादाच्या खूप आधी शूट करण्यात आला होता. फक्त त्याचा व्हिडीओ आता प्रदर्शित केला गेल्याचं म्हटलं जात आहे.