
सध्या सगळीकडे विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाचीच चर्चा आहे. चित्रपटाच्या रिलीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील डायलॉग आणि सीन्स अंगावर शहारे आणतात. अनेक जण तर एकदा पाहिल्यानंतर दुसऱ्यांदाही चित्रपट पाहायला जाणार असल्याचं म्हणताना दिसत आहेत. चाहत्यांकडून विकीचं प्रचंड कौतुक होत आहे.
सगळे थिएटर हाऊसफूल
14 फेब्रुवारीला चित्रपट रिलीज झाला. सगळे थिएटर हाऊसफूल पाहायला मिळत आहेत.प्र त्येक वयोगटातील प्रेक्षक हा सिनेमा पाहून मंत्रमुग्ध झाला आहे. छत्रपती संभाजी राजांचे बलिदान रुपेरी पडद्यावर पाहताना प्रत्येकाच्या डोळे पाणावले. एकूणच या सिनेमाला खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
विकीच्या पोस्टरला चाहत्याकडून दुग्धाभिषेक
दरम्यान या चित्रपटाबाबतचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. ज्यात एका चाहत्याने थिएटरबाहेर लागलेल्या विकीच्या पोस्टरवर दुधाचा अभिषेक केला आहे. स्वतः विकी कौशलने हा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमधील मुलाने भगव्या रंगाचा सदरा घातला असून तो सिनेमागृहाच्या छतावर उभा होता.
यावेळी तो जोरजोरात जयघोषही करताना दिसत आहे. त्याला खाली उभे असलेले इतर प्रेक्षक प्रतिसादही देताना दिसत आहे. त्यानंतर त्याने हातातील दुधाची पिशवी फोडून त्यातील दुधाने थिएटरबाहेर उभारलेल्या विकीच्या बॅनरला थेट दुग्धाभिषेक केला.
विकीने साकारलेली संभाजी महाराजांची भूमिका नि:शब्द करणारी
यावरूनच लक्षात येतं की या चित्रपटात विकीने साकारलेली संभाजी महाराजांची भूमिका ही पाहणाऱ्याला किती नि:शब्द करते ते. विकीने शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत दहा लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.
औरंगजेबाच्या भूमिकेतील अक्षय खन्नाचंही कौतुक
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांचंही तेवढंच कौतुक होत आहे. अभिनेत्री रश्मिका मंदानाने केलेल्या महाराणी येसूबाईंच्या भूमिकेचंही कौतुक होताना दिसत आहे. तर विकीनंतर जर प्रेक्षकांच्या तोंडी नाव असेल तर ते अक्षय खन्नाचं. औरंगजेबाच्या भूमिकेतील अक्षय खन्नाने पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे.