फराह खानच्या आईचं निधन; दोन आठवड्यांपूर्वीच साजरा केला होता वाढदिवस

कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानच्या आईचं निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्यावर काही शस्त्रक्रियाही झाल्या होत्या. अखेर शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 79 वर्षांच्या होत्या.

फराह खानच्या आईचं निधन; दोन आठवड्यांपूर्वीच साजरा केला होता वाढदिवस
फराह खान आणि तिची आई
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 26, 2024 | 4:28 PM

प्रसिद्ध बॉलिवूड कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानची आई मेनका इराणी यांचं शुक्रवारी मुंबईत निधन झालं. त्या 79 वर्षांच्या होत्या. मेनका या अभिनेत्री डेझी इराणी आणि हनी इराणी यांच्या बहीण होत्या. त्यांनी 1963 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बचपन’ या चित्रपटात काम केलं होतं. यामध्ये अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांनीसुद्धा भूमिका साकारली होती. मेनका यांनी निर्माते कामरान यांच्याशी लग्न केलं. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. रुग्णालयात त्यांच्यावर उपचारसुद्धा सुरू होते. मात्र त्या पूर्णपणे बऱ्या होऊ शकल्या नव्हत्या. काही दिवसांपूर्वी खुद्द फराह खानने तिच्या व्लॉगमध्ये याविषयीची माहिती दिली होती. दोन आठवड्यांपूर्वीच त्यांनी 79 वा वाढदिवस साजरा केला होता.

आईच्या वाढदिवसानिमित्त फराहने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली होती. आईसोबतचा फोटो पोस्ट करत तिने लिहिलं होतं, ‘आपण सर्वजण आपल्या आईला फार गृहित धरतो, खासकरून मी. या महिनाभराच्या काळात मला समजलं की मी माझ्या आईवर किती प्रेम करते. मी माझ्या आयुष्यात इतक्या खंबीर आणि साहसी व्यक्तीला पाहिलं नाही. अनेक शस्त्रक्रिया होऊनही त्यांची विनोदबुद्धी कायम होती. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई. घरी परत येण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. माझ्यासोबत पुन्हा लढण्यासाठी तू लवकरात लवकर तयार होशील अशी आशा करते. आय लव्ह यू!’

फराह आणि साजिद ही मेनका यांची दोन मुलं आहेत. पतीच्या निधनानंतर मेनका यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला होता. याविषयी फराहने विविध मुलाखतींमध्ये सांगितलं होतं. “होय, माझ्या कुटुंबाची पार्श्वभूमी ही सिनेसृष्टीशी संबंधित असली तरी मी पाच वर्षांची होती, तेव्हापासून आम्ही गरीबच होतो. आम्ही सर्व पैसे गमावले होते, वडिलांचे चित्रपटसुद्धा फ्लॉप झाले होते. मी, माझा भाऊ आणि माझ्या आईने गरीबीचेही दिवस पाहिले आहेत”, असं ती म्हणाली होती.