एकदा कार्यक्रमाला या, मग टीका करा.., ‘त्या’ VIDEO बद्दल स्पष्टच बोलली गौतमी पाटील; ऐकून माधुरी म्हणाली, एकदा चूक..
Gautami Patil: गौतमी पाटीलने नुकतीच 'कोण होणार करोडपती' या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी ती तिच्या व्हायरल व्हिडीओबद्दल आणि त्यावरून झालेल्या टीकेबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. त्यावर माधुरीने काय प्रतिक्रिया दिली, ते जाणून घ्या..

माधुरी दीक्षितचे रंगतदार किस्से, पाहुण्यांशी मनमोकळ्या गप्पा आणि त्यातून उलगडणाऱ्या आठवणी यांमुळे सोनी मराठीवरील ‘कोण होणार करोडपती’चा प्रत्येक भाग खास ठरत आहे. आगामी भागात महाराष्ट्रातील दोन लोकप्रिय चेहरे, शिव ठाकरे आणि गौतमी पाटील हॉट सीटवर विराजमान होणार आहेत. या गप्पांमध्ये गौतमीच्या व्हायरल डान्स व्हिडिओचा विषय निघताच संवादाला गंभीर वळण मिळणार आहे. या व्हिडिओमुळे झालेली टीका, त्यानंतर मागितलेली माफी आणि स्वतःमध्ये केलेले बदल यांबद्दल गौतमी माधुरीसमोर आपली बाजू मांडताना दिसणार आहे.
या एपिसोडमध्ये गौतमी म्हणाली, “त्या वेळेस मला खूप ट्रोल केलं गेलं. अक्षरशः मी कार्यक्रमाला होते आणि तो व्हिडिओ सोशल मीडिया, न्यूज, सगळीकडे चालू होता. कार्यक्रम संपल्यावर मी घरी येत होते आणि मला कळलं की असं असं माझ्यासोबत घडलंय. मी ताबडतोब प्रतिक्रिया दिली की माझ्याकडून चुकून झालं. मी जे काही केलं, ते माझ्याकडून नकळत होऊन गेलं. मी पूर्ण महाराष्ट्राची माफी मागते. नंतर मी माझ्यात खूप सुधारणा केली. त्यानंतर मी अजिबात काही चूक केली नाही. पण ते काय म्हणतात ना, की एक टॅग लागला तर मग त्याच गोष्टी किंवा माझे जुने व्हिडिओ, म्हणजे आत्ताही मी जे छान करतेय, ते नाही दाखवत. जे मी केलंय ते व्हिडिओ पण अजून दाखवतायत. त्यामुळे लोकांना वाटतं की, ‘अरे, अजूनही तेच करतेय का?’ असंही होतं.”
याविषयी तिने पुढे म्हटलं, “पण माझ्यात खूप सुधारणा झाली आहे. तुम्हाला एवढं वाटतं की मी एवढ्या चुका करते, मी अजूनही तेच करतेय, तर तुम्ही एकदा माझ्या कार्यक्रमाला येऊन बघा. जर चूक वाटली ना, तर बोला. पण माझ्यात आता खूप सुधारणा झाली आहे.” पूर्वी आपल्या कार्यक्रमांना प्रामुख्याने पुरुष प्रेक्षक येत असले, तरी आता महिला प्रेक्षकांची संख्या अधिक असल्याचंही गौतमीने सांगितलं. टीकेच्या काळातही प्रेक्षकांनी साथ दिल्यामुळे आपल्याला कार्यक्रम आणि काम मिळत राहिल्याचं तिने नमूद केलं.
गौतमीची ही बाजू ऐकल्यानंतर माधुरी दीक्षित म्हणाली, “तुम्ही एकदा चूक मान्य केली आणि सुधारणा केली, तर मग काय बोलायचं? काही विषयच राहत नाही.” ‘कोण होणार करोडपती’ हा शो सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता सोनी मराठी वाहिनीवर आणि सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येतो.