Gautami Patil: वडील माझ्यावर संशय घ्यायचे, आईच्या अपघातानंतर सगळं बदललं; गौतमी पाटीलने सांगितला संघर्ष

Gautami Patil: आज गौतमी पाटील ही महाराष्ट्रातील लोकप्रिय नृत्यांगनांपैकी एक आहे. तिच्या कार्यक्रमांमधील गर्दी, सोशल मीडियावरील लोकप्रियता आणि चाहत्यांचं प्रेम यामुळे ती सातत्याने चर्चेत असते.

Gautami Patil: वडील माझ्यावर संशय घ्यायचे, आईच्या अपघातानंतर सगळं बदललं; गौतमी पाटीलने सांगितला संघर्ष
Gautami Patil
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 25, 2026 | 11:50 AM

महाराष्ट्रात आपल्या नृत्याने लाखो चाहत्यांना भुरळ घालणारी नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या आयुष्यातील एक वेदनादायी बाजू पुन्हा चर्चेत आली आहे. स्टेजवर आत्मविश्वासाने नृत्य करणारी गौतमी वैयक्तिक आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांना सामोरी गेली आहे. वडिलांचं व्यसन, आईला सहन करावा लागलेला त्रास आणि कुटुंबापासून दूर राहण्याची वेळ यामुळे तिचं बालपण संघर्षात गेलं. एका मुलाखतीत तिने वडिलांच्या व्यसनामुळे कुटुंबावर काय परिणाम झाला, याबद्दल मनमोकळेपणाने सांगितलं होतं. तिच्या या अनुभवातून तिच्या यशामागील संघर्षाची कहाणी समोर आली आहे.

वडिलांच्या व्यसनामुळे कुटुंबात तणाव

वडील रवींद्र पाटील यांना दारूचं व्यसन होतं, असं गौतमीने सांगितलं. त्यामुळे घरात अनेकदा वाद होत असत. तिच्या आईला या परिस्थितीचा मोठा त्रास सहन करावा लागला. गौतमीचा जन्म होण्यापूर्वीच तिचे आई-वडील वेगळे झाले होते. त्यामुळे लहानपणापासून वडिलांचं प्रेम आणि सहवास तिला फारसा मिळाला नाही. गौतमीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिला वडील आहेत हे माहीत होतं. मात्र ते तिच्यासोबत राहत नव्हते. आठवीत असताना तिने पहिल्यांदा वडिलांना पाहिलं. त्यानंतर त्यांना पुण्यात आणून त्यांच्यासोबत राहण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र, दारूचं व्यसन सुरूच राहिल्याने कुटुंबाला पुन्हा वेगळं राहण्याचा निर्णय घ्यावा लागला. वडील रोज दारू प्यायचे, आईला मारायचे. ते माझ्यावर देखील काही गोष्टींचा संशय घ्यायचे. माझ्या आईवर देखील संशय घेत होते, असा खुलासा गौतमीने केला.

Loading...

आईने एकटीने केला मुलीचा सांभाळ

गौतमीच्या आयुष्यात तिच्या आईची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे. वडिलांच्या अनुपस्थितीत आईनेच तिचा सांभाळ केला. कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्यासाठी आईने नोकरी केली. मात्र, तिच्या आईचा अपघात झाल्यानंतर परिस्थिती आणखी कठीण बनली. काम करणं शक्य नसल्याने आर्थिक अडचणी वाढल्या आणि गौतमीच्या शिक्षणावरही परिणाम झाला.

अशा परिस्थितीत कुटुंबाला हातभार लावण्यासाठी गौतमीने काम करण्यास सुरुवात केली. नृत्याच्या क्षेत्रात येण्यामागे केवळ आवड नव्हती, तर परिस्थितीशी लढण्याची गरजही होती. तिने मेहनतीच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण केली. आज तिच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी होते; मात्र या यशामागे अनेक कठीण अनुभव दडलेले आहेत.

गौतमीने एका मुलाखतीत आपल्या आयुष्याबद्दल बोलताना वडिलांच्या वागण्याचा उल्लेख केला होता. वडिलांनी त्या काळात वेगळं वर्तन केलं असतं, तर कदाचित आपल्या आयुष्याची दिशा वेगळी असती, असं तिने सूचित केलं होतं. तिच्या मते, परिस्थितीमुळेच तिला लहान वयात काम करण्याचा निर्णय घ्यावा लागला. तरीही वडिलांबद्दल तिने माणुसकीची भावना कायम ठेवली. तिचे वडील आजारी अवस्थेत आढळल्यानंतर गौतमीने त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र, उपचारादरम्यान सप्टेंबर 2023 मध्ये त्यांचं निधन झालं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us