NCP Merger: राज्यात मोठ्या घडामोडी… दोन्ही राष्ट्रवादीची गुप्त बैठक, विलिनीकरणावर शिक्कामोर्तब?
NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची आज बैठक होत असतानाच एक मोठी घडामोड समोर आली आहे. दोन्ही राष्ट्रवादीचे मोठे नेत्यांमध्ये दोन दिवसांपूर्वी गुप्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे राज्यात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अक्षय मंकणी, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी: राज्यात रविवारी अचानक राजकीय खलबतं सुरू झाली. राजकीय वर्तुळातून आताच्या घडीला एक अपडेट समोर येत आहे. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मध्यंतरी चर्चा थंडबस्त्यात गेली होती. पण आता या चर्चांना पुन्हा हवा मिळाली आहे. दोन्ही राष्ट्रवादीचे मोठे नेत्यांमध्ये दोन दिवसांपूर्वी गुप्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे राज्यात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दोन्ही गटाच्या नेत्यांची गुप्त बैठक
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष आणि अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये दोन दिवसांपूर्वी गुप्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा यामध्ये झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यापूर्वी सुद्धा अशा चर्चा झाल्याच्या वार्ता आल्यात. पण दोन्ही काँग्रेसकडून सातत्याने त्याचा इनकार करण्यात आला आहे. आता विलिनीकरणाच्या चर्चेत किती तथ्य आहे हे लवकरच समोर येईल.
यापूर्वीच्या चर्चा वांझोट्या
अजितदादा हयात असताना दोन्ही पक्षाच्या विलिनीकरणासाठी प्रयत्न झाले. बैठक झाली असा दावा शरद पवार गटाने केला होता. तर अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी हा दावा फेटाळला होता. त्यानंतर राज्यात अनेकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची सातत्याने चर्चा झाली. पण या चर्चा वांझोट्या ठरल्या. त्यातून आरोप-प्रत्यारोपाच्या खेळीशिवाय काहीएक हाती लागले नाही. भाजपसोबत राहायचे, जायचे की आघाडीसोबत घरोबा करायचा असे अनेक अंडरकरंट या संवाद-विसंवादातून समोर आले.
विलिनीकरणाची चर्चा बंद
दरम्यान नुकतीच मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली. पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यानंतर आज अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी वर्षावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यात अर्थखाते देण्याबाबत फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे भुजबळांनी सांगितले. तर याचवेळी त्यांनी विलिनीकरणाची चर्चा पूर्णपणे बंद झाल्याचा दावा केला आहे. यापूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सुद्धा विलिनीकरणाच्या चर्चेवर पडदा पडल्याचा दावा केला होता. पण दोन दिवसांपूर्वी दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये गुप्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यावर अशी कुठलीही चर्चा झालेला नाही असे भुजबळ म्हणाले.
