फडणवीसांच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार? दादांच्या राष्ट्रवादीतील 5 मंत्री बदलणार?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीकडून 5 मंत्री बदलण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बैठकांचा धडाका लावला आहे. सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी दुसरी बैठक होत आहे. अर्थखात्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले. याचदरम्यान राष्ट्रवादीकडून 5 मंत्री बदलण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे.
सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीच्या वर्तुळात राजकीय घडोमोडी वाढल्या आहेत. दादांच्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची आज 9 वाजता बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. कोअर कमिटीच्या बैठकीनंतर सर्व वरिष्ठ नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले. अर्थ खात्याच्या मागणीसाठी नेते मंडळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचल्याचे सांगण्यात आलं.
विलिनीकरणाची पुन्हा चर्चा
दोन्ही राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची बैठक झाल्याची दावा केला जात आहे. या भेटीत विलिनीकरणाची चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. परंतु दादांच्या राष्ट्रवादीने ही चर्चा फेटाळून लावली आहे. याचदरम्यान दादांच्या राष्ट्रवादीकडून 5 मंत्री बदलण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे भविष्यात फडणवीसांच्या मंत्रिमंडळात फेरबदल पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चर्चा फेटाळली
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 5 मंत्री बदलण्याच्या चर्चेवर आमदार अनिल पाटील म्हणाले, ‘दोन्ही राष्ट्रवादीची अशी कुठेही बैठक झालेली नाही. बैठक झाली असेल, तर त्याबद्दल मला काहीही माहिती नाही. दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरण संदर्भात आमच्या स्तरावर कुठेही चर्चा झालेली नाही किंवा पोहचलेली नाही. मात्र दोन्ही राष्ट्रीय विलीनीकरणासंदर्भात अशी कुठली चर्चा झालेली मला वाटत नाही. मंत्रिमंडळातील फेरबदलाचा अधिकार हा नेत्यांचा असतो, राज्याचे मुख्यमंत्र्यांचा असतो. मंत्री बदलण्यास संदर्भात देखील चर्चा आमच्यासमोर आजतागायत झालेली नाही’. अनिल पाटील यांच्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनीही विलिनीकरणाची चर्चा फेटाळून लावली आहे. भुजबळ यांनी विलिनीकरणासाठी दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट झाली नसल्याचे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
