माझ्या मुलाने ते पाहिलं तर..; ट्रेंडच्या नावाखाली अश्लील फोटो बनवणाऱ्यांना, शेअर करणाऱ्यांना गिरीजा ओकची विनंती

सोशल मीडियावर ट्रेंड होत असताना एआयचा वापर करून काही अश्लील फोटोसुद्धा व्हायरल केले जात असल्याची तक्रार अभिनेत्री गिरीजा ओकने केली आहे. गेल्या काही दिवसांपासून 'निळ्या साडीतली' अभिनेत्री म्हणून ती प्रचंड व्हायरल होत आहे.

माझ्या मुलाने ते पाहिलं तर..; ट्रेंडच्या नावाखाली अश्लील फोटो बनवणाऱ्यांना, शेअर करणाऱ्यांना गिरीजा ओकची विनंती
Girija Oak
Image Credit source: Instagram
Updated on: Nov 14, 2025 | 9:51 AM

मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. गिरीजाची एक मुलाखत आणि तिचा निळ्या साडीतील लूक चर्चेत आला आहे. परंतु याच ट्रेंडचा फायदा घेत काहींनी तिचे AI जनरेटेड आणि मॉर्फ करून अश्लील फोटो व्हायरल केले. या फोटोंबाबत आता गिरीजाने नेटकऱ्यांना विनंती केली आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत तिने तिच्या भावना मोकळेपणे व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडियावर ट्रेंड होत असताना मनात काय भावना आहेत आणि मॉर्फ्ड केलेले फोटो पाहिल्यावर जी भीती वाटतेय, ते तिने स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे.

काय म्हणाली गिरीजा?

“गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जे सुरू आहे, ते भांबावून सोडणारं आहे. मला आनंदही खूप होतोय. खूप छान कमेंट्स आणि मेसेजेस येत आहेत. मला भरभरून प्रेम मिळतंय. याबद्दल मी आभारी आहे. माझ्या ओळखीचे नातेवाईक, मित्रमंडळी या सर्वांनी मला विविध पोस्ट, फोटो आणि मीम्स पाठवले आहेत. त्यातल्या काही खूप क्रिएटिव्ह आणि खूप मजेशीर आहेत. त्याचबरोबर काही फोटो अश्लीलसुद्धा आहेत. एआयचा (AI) वापर करून ते एडिट करण्यात आले आहेत. अशा प्रकारचे फोटो सोशल मीडियावर टाकले जातात, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मीसुद्धा याच काळातली मुलगी आहे, सोशल मीडिया वापरणारी मुलगी आहे. मला माहितीये की एखादी गोष्ट ट्रेंडिंगमध्ये असते, व्हायरल होते, तेव्हा अशा पोस्ट केल्या जातात. एआयचा वापर करून बायकांचे आणि पुरुषांचे फोटो विकृत केले जातात किंवा बदलले जातात,” असं गिरीजा म्हणाली.

याविषयी तिने पुढे सांगितलं, “कुठल्याही मार्गाचा वापर करून तुमच्या त्या पोस्टवर लोकांनी क्लिक करावं, यासाठी ते सर्व प्रयत्न असतात. मग त्याची एंगजेमेंट वाढावी आणि हा सर्व खेळ सुरू होतो. पण या खेळात काहीच अनुचित नाहीये. या गोष्टीची मला भीती वाटते. मला एक 12 वर्षांचा मुलगा आहे. आता तो सोशल मीडियाचा वापर करत नाही. पण कदाचित पुढे करेल. मॉर्फ केलेले फोटो आज-उद्या आपल्याला दिसतील, पण ते इंटरनेटवर कायम राहतील. माझ्या मुलाने मोठं झाल्यावर माझा असा एडिट केलेला फोटो पाहिला, तर त्याला काय वाटेल, याचा विचार करून मला अजिबात चांगलं वाटत नाही. त्याला हे कळेल की हा खरा फोटो नाहीये. पण तरीही ते फोटो बघताना एक घाणेरड्या प्रकारची मजा येते. या सगळ्या गोष्टींचा विचार करून मला हे सांगावंसं वाटलं.”

नेटकऱ्यांना विनंती करत ती पुढे म्हणाली, “मला माहितीये की याबद्दल मी फारसं काही करू शकणार नाही. पण काहीच न करणं पण मला उचित वाटत नव्हतं. म्हणून मी ही विनंती करतेय. जर तुम्ही तशा प्रकारचे फोटो बनवत असाल, तर एकदा विचार करून बघा. पण जर तुम्ही एडिट करत नसाल पण तसे फोटो बघत असाल आणि लाइक करत असाल, तर हे थोडंसं तुमच्यामुळेही आहे. याची जाणीव तुम्हाला आहे का, हे पडताळून बघा, अशी माझी विनंती आहे.”