आई-वडिलांचा घटस्फोट, स्वत:लाच करावी लागली लग्नाची बोलणी.. अशी आहे गिरीजा ओकची हटके लव्ह स्टोरी
गिरीजा आणि सुहृदला अत्यंत साधेपणानं लग्न करायचं होतं. गिरीजाचे सासरे श्रीरंग गोडबोले तर मस्करीत त्यांना म्हणाले होते की "तुम्ही पळून जाऊन लग्न करा, म्हणजे कोणालाच खर्च नको." परंतु आपल्या लेकीचं लग्न थाटामाटात आणि साग्रसंगीत व्हायला हवं अशी गिरीजाच्या आईची इच्छा होती. त्यानुसार 2011 मध्ये दोघांनी हिंदू विवाहपद्धतीनुसार लग्न केलं.

सोशल मीडियावर सध्या तुफान चर्चा आहे ती ‘निळ्या साडीतल्या’ अभिनेत्रीची आणि ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून मराठमोळी गिरीजा ओक आहे. गिरीजाची नुकतीच एक मुलाखत तुफान व्हायरल झाली आहे आणि त्या मुलाखतीतला तिचा लूकसुद्धा चर्चेत आला आहे. मराठी प्रेक्षकांना जरी गिरीजा माहीत असली तरी असे अनेकजण आहेत, ज्यांना तिचे हे फोटो व्हायरल झाल्यानंतर तिच्याविषयी कुतूहल निर्माण झालं. गिरीजाबद्दल जाणून घेण्यासाठी असंख्य नेटकरी उत्सुक आहेत. तिने मराठीसोबतच हिंदी आणि गुजराती कलाविश्वातही काम केलंय. गिरीजा ही अभिनेते गिरीश ओक यांची मुलगी आहे. 2011 मध्ये तिने निर्माता सुहृद गोडबोलेशी लग्न केलं. या दोघांना एक मुलगा आहे. एका मुलाखतीत गिरीजा आणि सुहृद यांनी त्यांची हटके लव्ह-स्टोरी सांगितली होती.
‘द अनुरुप शो’ला दिलेल्या मुलाखतीत सुहृदने सांगितलं की गिरीजाशी त्याची पहिली भेट 2008 मध्ये आदित्य सरपोतदारच्या साखरपुड्यात झाली होती. या साखरपुड्यात गिरीजा तिच्या तेव्हाच्या बॉयफ्रेंडसोबत आली होती. या पहिल्या भेटीत गिरीजा आणि सुहृद यांच्यात काही बोलणं झालं नव्हतं. नंतर काही दिवसांनी एका प्रोजेक्टच्या निमित्ताने दोघं संपर्कात आले. “एका शोच्या सूत्रसंचालनासाठी माझी निवड झाली होती. त्यानिमित्ताने सुहृदने मला फोन केला होता. आपण तारखा, मानधन, कॉस्च्युम वगैरे ठरवुयात, असं तो म्हणाला. त्यावेळी कोणीतरी मोठी प्रौढ व्यक्ती माझ्याशी फोनवर बोलतेय असं मला वाटलं होतं. पण जेव्हा गोव्याला मी शूटिंगसाठी गेले आणि सुहृदला समोर पाहिलं, तेव्हा तो पंचविशीतला मुलगा होता. हा मुलगा माझ्याशी फोनवर बोलत होता का, असा मला प्रश्न पडला होता”, असं गिरीजाने सांगितलं.
View this post on Instagram
अनेकदा जोडप्यांच्या आवडी जुळतात, परंतु गिरीजा आणि सुहृदच्या मात्र नावडी जुळल्या होत्या. याविषयीचा मजेशीर किस्सा गिरीजाने पुढे सांगितला. ती म्हणाली, “आम्ही गोव्याच्या मार्केटमध्ये छोट्या-मोठ्या गोष्टी खरेदी करत होतो. तेव्हा दोघांच्याही गणिताची बोंब आहे हे एकमेकांना समजलं होतं. कारण सामानाची बेरीज आम्ही दोघंही मोबाइलमधल्या कॅल्क्युलेटरमध्ये करत होतो. तेव्हा आम्हाला समजलं की, दोघं एकसारखेच आहोत, आपलं जमू शकतं. नंतर त्याच प्रोजेक्टमध्ये काम करताना अमेय गोसावी आणि दर्शना जोग या दोघांनी आम्हाला सुचवलं की, एकमेकांना डेट करून पहा. त्यावर विचार करायला हरकत नाही, असं दोघांना वाटलं होतं. एका कॅफेमध्ये आम्ही भेटलो आणि नंतर सहजच आमचे सूर जुळले.”
गिरीजा आणि सुहृदचं लग्न ठरलं आणि साखरपुड्याची वेळ आली तेव्हा गिरीजाचे आई-वडील विभक्त झाले होते. दोघांनीही आपला वेगळा संसार थाटला होता. “लग्नाची बोलणी करतो तेव्हा माझ्यासमोर चार गोडबोले (सुहृदचे कुटुंबीय) होते. तर माझ्या बाजूने माझी आई, तिचा नवरा, त्यांची मुलं, माझे बाबा, त्यांची बायको आणि त्यांची मुलं असा मोठा परिवार होता. त्यामुळे जेव्हा सुहृदच्या आईने विचारलं की लग्नाची बोलणी कोणाशी करायची? तेव्हा माझ्याशीच करा, असं मी त्यांना म्हटलं होतं”, असं गिरीजाने पुढे सांगितलं.
