Gokul: तुमचं पण दूध जातं का गोकुळात? ‘मुळशी पॅटर्न’च्या अभिनेत्याची कमेंट; कलाकारांमध्येही रंगली गोकुळ निवडणुकीची चर्चा

Gokul Election: एकीकडे गोकुळच्या निवडणुकीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असताना दुसरीकडे कलाकारांमधील ही सोशल मीडिया जुगलबंदी चर्चेचा विषय बनली आहे.

Gokul: तुमचं पण दूध जातं का गोकुळात? मुळशी पॅटर्नच्या अभिनेत्याची कमेंट; कलाकारांमध्येही रंगली गोकुळ निवडणुकीची चर्चा
रमेश परदेशी, गोकुळ निवडणूक निकाल
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 11, 2026 | 10:34 AM

Gokul Election: कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची चर्चा सध्या केवळ राजकीय वर्तुळातच नाही, तर मनोरंजनविश्वातही रंगताना दिसत आहे. गोकुळच्या अध्यक्षपदावर अखेर महायुतीचे राजेश पाटील यांची निवड झाल्यानंतर सोशल मीडियावर या निवडणुकीचे पडसाद उमटत आहेत. अशातच ‘मुळशी पॅटर्न’ फेम अभिनेता रमेश परदेशी अर्थात पिट्याभाई याने केलेली एक कमेंट चर्चेचा विषय ठरली आहे. ‘तुमचं पण दूध जातं का गोकुळात?’ असा खोचक सवाल त्याने अभिनेता आणि लेखक राजकुमार तांगडे यांना केला आहे. त्यानंतर दोन्ही कलाकारांमध्ये सोशल मीडियावर रंगलेली जुगलबंदी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

राजकुमार तांगडेंची गोकुळ निवडणुकीवर मिश्कील पोस्ट

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने 25 पैकी 13 जागा जिंकल्या होत्या. तर महायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीला 12 जागा मिळाल्या होत्या. मात्र, अध्यक्षपदाच्या निवडीवेळी आवश्यक असलेला कोरम पूर्ण न झाल्याने निवडणुकीला वेगळं वळण मिळालं. याच राजकीय घडामोडींवर भाष्य करत कलाकार राजकुमार तांगडे यांनी फेसबुकवर एक मिश्कील आणि उपरोधिक पोस्ट लिहिली.

Loading...

‘बारातून तेरा गेले, खाली राहिले उणे एक, मग पंचवीसमध्ये हातचे चार घेतले, बरोबर झाले सोळा. आता लोकशाहीची हत्या झाली म्हणून कोर्टात हातपाय चोळा, तोवर आम्ही खातो गोकुळच्या लोण्याचा गोळा…’ अशा शब्दांत त्यांनी गोकुळच्या निवडणुकीवर टोला लगावला.

पहा पोस्ट आणि त्यावरील कमेंट्स

पिट्याभाईचा खोचक प्रश्न; तांगडेंचंही भन्नाट उत्तर

राजकुमार तांगडे यांच्या या पोस्टवर अभिनेता रमेश परदेशी याने कमेंट केली. ‘तुमचं पण दूध जातं का गोकुळात?’ असा थेट सवाल त्याने केला. यावर तांगडे यांनीही ‘माझं पोट शेतीवर आहे आणि मला धार काढता येते बरका रमेशराव…’ असं उत्तर दिलं. त्यानंतर रमेश परदेशीनेही आपल्या शेतीची माहिती देत उत्तर दिलं. ‘अहो, आम्ही पण शेतकरी आहोत आणि पार्ट टाइम अभिनय करतो. आमच्याकडे 10 गाई आहेत आणि धारा काढण्यासोबत आधुनिक यंत्रणाही आहे,’ असं त्याने म्हटलं. त्यावर तांगडे यांनीही आपल्याकडे लहान-मोठ्या दहा-पंधरा म्हशी असल्याचं सांगितलं. मराठवाड्यातील असल्यामुळे अजून धार काढण्याचं मशीन नसल्याची मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली. कोल्हापूरचा असो किंवा मराठवाड्यातील, शेतकरी एकच असतो, असंही त्यांनी म्हटलं.

अखेर गोकुळच्या अध्यक्षपदी राजेश पाटील

दरम्यान, 10 नोव्हेंबर रोजी गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यामध्ये महायुतीचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश पाटील यांनी बाजी मारली. त्यांना 16 मतं मिळाली, तर सतेज पाटील यांच्या पॅनलचे उमेदवार शशिकांत पाटील-चुयेकर यांना 13 मतं मिळाली. शासननियुक्त चार संचालकांच्या मतदानामुळे या निवडणुकीची राजकीय समीकरणेही चर्चेत आली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us