मी माफी मागतो.., गोविंदाने एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर सोडलं मौन; म्हणाला ‘हे माझं लहानपणीचं प्रेम..’

नव्वदच्या दशकात आपल्या अभिनयाने आणि डान्सने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या गोविंदाच्या खासगी आयुष्यात सध्या बरेच चढउतार पहायला मिळत आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या आरोपांवर मौन सोडलं आहे.

मी माफी मागतो.., गोविंदाने एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर सोडलं मौन; म्हणाला हे माझं लहानपणीचं प्रेम..
Govinda and Sunita Ahuja
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 10, 2026 | 3:16 PM

अभिनेता गोविंदावर पत्नी सुनीता अहुजानेच एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे (विवाहबाह्य संबंध) आरोप केले होते. या आरोपांवर त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मौन सोडलं आहे. “आजकाल इंडस्ट्रीत स्ट्रगल करणाऱ्या मुलींना शुगर डॅडीची सवय झाली आहे. एखादी मुलगी विचार करते की मला पॉकेट मनी मिळून जाईल, माझं घरदार चालेल,” असा सुनीता म्हणाली होती. इथे तिने गोविंदाचा उल्लेख ‘शुगर डॅडी’ म्हणून केला होता. या आरोपांवर उत्तर देताना गोविंदा म्हणाला, “माझ्यावर असे आरोप कधी लावले नव्हते? जो आरोप लावला जात आहे, ते माझ्या बालपणीचं प्रेम आहे. प्रेमाच्या बाबतीत मी कधीच चांगला नव्हतो. काहींच्या मते, आता मला जे प्रेम मिळालंय, ते म्हातारपणातलं आहे.”

“मी चार सुपरस्टार आणि एका मिस युनिव्हर्स हिरोइनसोबत काम केलं आहे. मी कधीच त्यांना कमी लेखलं नाही. माझी एकही हिरोइन असं म्हणू शकत नाही की मी तिला त्रास दिला किंवा कोणाचाही अपमान केला. मी सर्व अभिनेते आणि अभिनेत्रींचे आभार मानतो. माझ्या चित्रपटांच्या यशात त्यांचा, माझ्या दिग्दर्शकांचा, गाण्यांचा खूप मोठा वाटा आहे, माझी आई एक नायिका होती. मी कधीच कोणत्याही नायिकेसोबत गैरवर्तन केलं नाही. आता ती नावं घेत आहे, हे मी पाहिलंय. मला असे शब्द अजिबात आवडत नाहीत. म्हणून मी माफी मागतो. माझी आई मला म्हणायाची की, गोविंद जर तू तुझ्या कुटुंबातील चार सदस्यांनाच आपलं जग मानलंस, तर एके दिवशी ते तुझा विश्वासघात करतील. मी माझ्या सर्व अभिनेत्रींचे आभार मानतो. कारण त्यांच्यामुळेच आज मी इथे आहे”, अशा शब्दांत गोविंदा व्यक्त झाला.

गोविंदाने या मुलाखतीत त्याच्याशी जोडल्या जाणाऱ्या नावावरही प्रतिक्रिया दिली आहे. “हे जे कोमल नाव घेतलं जात आहे, मी आभार मानतो की आज मी वाचलो. ती एकही शब्द बोलत नाही, ती गप्प आहे. आजकाल इतके तरुण आहेत”, असं तो पुढे म्हणाला. गोविंदाने 1987 मध्ये सुनीताशी लग्न केलं. या दोघांना टिना आणि यशवर्धन ही मुलं आहेत. टीनाने 2015 मध्ये ‘सेकंड हँड हसबंड’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तर यशवर्धन लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.