Haiwaan teaser : टीझर असावा तर असा.. अंगावर काटा आणणारा सैफ अली खान – अक्षय कुमारचा ‘हैवान’

Haiwaan teaser : या टीझरमध्ये कोणाचाही चेहरा दाखवण्यात आला नाही, त्यात डायलॉग्सही नाहीत.. तरीसुद्धा यातील दृश्ये आणि पार्श्वसंगीत अंगावर अक्षरश: काटा आणतात. हैवान या चित्रपटात सैफ अली खान आणि अक्षय कुमार यांच्या भूमिका आहेत.

Haiwaan teaser : टीझर असावा तर असा.. अंगावर काटा आणणारा सैफ अली खान - अक्षय कुमारचा हैवान
Haiwaan teaser
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 12, 2026 | 2:25 PM

अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘हैवान’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. सहसा चित्रपटांच्या टीझरमध्ये अनेकदा कथेचा थोडाफार उलगडा होतो. परंतु या सायकोलॉजिकल थ्रिलरने टीझरमध्ये कथेचं रहस्य कायम ठेवलं आहे. चित्रपट नेमका कशाबद्दल आहे हे उघड न करता ‘हैवान’चा टीझर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत त्यांना गुंतवून ठेवतो. जवळपास 45 सेकंदांच्या या टीझरची सुरुवात एका गूढ संगीताने आणि एका व्यक्तीच्या सावलीने होते. त्यानंतर हळूहळू आवाज वाढत जातो आणि दृष्ट वाटणारी दुसरी व्यक्ती समोर येते.

या चित्रपटात सैफने दृष्टीहीन व्यक्तीची भूमिका साकारली आहे. काठीच्या आधाराने चालणं आणि हातावर अंधांसाठी असलेलं विशेष घड्याळ यावरून हे स्पष्ट होतं. तर दुसरीकडे रक्ताने माखलेला हात काहीतरी हिंसक घडल्याचं सूचित करतं. या टीझरचं वैशिष्ट्य म्हणजे यात सैफ आणि अक्षय या दोन्ही कलाकारांचे चेहरे दाखवलेले नाहीत. तसंच चित्रपटातील इतर पात्रांचे शॉट्स किंवा कथानकाविषयी तपशीलही दिलेला नाही. हैवानच्या या टीझरने प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण केली आहे.

पहा टीझर-

या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक प्रियदर्शन आणि अक्षय कुमार पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. हे समीकरण म्हणजे चित्रपट हिट होणारच, अशा प्रतिक्रिया नेटकरी त्यावर देत आहेत. तसंच या चित्रपटात अक्षय एका खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याने, त्याबद्दल कुतूहल निर्माण झालं आहे. ‘एकही डायलॉग नसतानाही टीझर पाहून अंगावर काटा आला’, अशी कमेंट एकाने केली आहे. तर ‘प्रियदर्शन + अक्षय कुमार = ब्लॉकबस्टर’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. तर काहींनी किमान कलाकारांचे चेहरे तरी दाखवावेत, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

‘हैवान’ या चित्रपटात अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांच्यासोबतच बोमन इराणी, सैयामी खेर आणि श्रिया पिळगांवकर यांच्याही भूमिका आहेत. ‘हैवान’ची निर्मिती केव्हीएन प्रॉडक्शन्स आणि थेस्पियन फिल्म्सच्या बॅनरखाली व्यंकट के. नारायण आणि शैलजा देसाई फेन यांनी केली आहे. हा चित्रपट 11 सप्टेंबर 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us