Hansika Motwani: ‘कोई मिल गया’मधली चिमुकली आठवतेय? आता बिझनेसमनशी बांधली लग्नगाठ, पहा फोटो

हंसिका मोटवानीने 'या' बिझनेसमनशी केलं लग्न; पहा शाही विवाहसोहळ्याचे खास फोटो

Hansika Motwani: कोई मिल गयामधली चिमुकली आठवतेय? आता बिझनेसमनशी बांधली लग्नगाठ, पहा फोटो
हंसिका मोटवानीने 'या' बिझनेसमनशी केलं लग्न
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 05, 2022 | 10:42 AM

जयपूर: हृतिक रोशन आणि प्रिती झिंटा यांच्या ‘कोई मिल गया’ या चित्रपटातील चिमुकली आठवतेय का? ती चिमुकली आता मोठी झाली असून तिने बिझनेसमन सोहैल कठुरियाशी लग्न केलं आहे. कोई मिल गया या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केल्यानंतर अभिनेत्री हंसिका मोटवानीने बॉलिवूडमधील इतरही चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. मात्र बॉलिवूडपेक्षा जास्त प्रसिद्धी आणि लोकप्रियता तिला साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये मिळाली. हंसिकाने नुकतंच जयपूरमधील मुंडोटा फोर्ट अँड पॅलेस याठिकाणी लग्न केलं.

या शाही विवाहसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हंसिकावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. या लग्नसोहळ्याला कुटुंबीय आणि जवळचा मित्रपरिवार उपस्थित होता. या लग्नसोहळ्यात हंसिकाने लाल रंगाचा लेहंगा तर सोहैलने मोती रंगाची शेरवानी परिधान केली. सिंधी विवाहपद्धतीनुसार हा विवाहसोहळा पार पडला.

हंसिकाचं प्री-वेडिंग सेलिब्रेशन 2 डिसेंबरपासून सुरू झालं. तर 3 डिसेंबर रोजी मेहंदी आणि संगीत कार्यक्रम पार पडला. 4 डिसेंबर रोजी हंसिका आणि सोहैल विवाहबंधनात अडकले. पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, सोहैलचं हे दुसरं लग्न आहे. 2016 मध्ये सोहैलने रिंकी नावाच्या तरुणीशी लग्न केलं होतं. गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग पार पडलं होतं.

हंसिकाने बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. ‘शका लका बुम बुम’ या मालिकेमुळे तिला लोकप्रियता मिळाली. तिने तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.

हंसिका आणि सोहैलच्या लग्नाप्रमाणेच त्याचं मॅरेज प्रपोजलसुद्धा चर्चेत होतं. सोहैलनं पॅरिसमधील आयफेल टॉवरसमोर हंसिकाला प्रपोज केलं होतं. सध्या हंसिका आणि सोहैल हे बिझनेस पार्टनरसुद्धा आहेत. हंसिकाची इव्हेंट मॅनेजमेंटची कंपनी आहे. याच कंपनीत दोघं पार्टनर आहेत.