Zee Marathi New Serial: हर्षद अतकरीचा जबरदस्त कमबॅक, बांदेकरांच्या सुनेसोबत जमली जोडी; सातारी भाषा अन् रांगडा स्वॅग
Harshad Matkari Zee Marathi : झी मराठीची आगामी मालिका 'येतेच आता मी नांदायला’ मध्ये हर्षद मत्करीने ‘अभिजीत थोरात’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे . आपल्या या नव्या भूमिकेबद्दल आणि शूटिंगच्या अनुभवाबद्दल हर्षदने मनमोकळेपणाने संवाद साधला.

Yetech Mi Nandyala Zee Marathi Serial: प्रत्येक कलाकाराला आपल्या अभिनयातील वेगवेगळ्या पैलूंना प्रेक्षकांसमोर आणण्याची इच्छा असते. काही भूमिका या कलाकारासाठी खास असतात, कारण त्या त्याला काहीतरी नवीन शिकवतात आणि त्याच्या अभिनयाला एक वेगळी ओळख देतात. अशाच एका वेगळ्या भूमिकेतून अभिनेता हर्षद अतकरी जवळपास दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. झी मराठीची आगामी मालिका ‘येतेच आता मी नांदायला’ मध्ये तो ‘अभिजीत थोरात’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे . आपल्या या नव्या भूमिकेबद्दल आणि शूटिंगच्या अनुभवाबद्दल हर्षदने मनमोकळेपणाने संवाद साधला.
याबद्दल बोलताना हर्षद म्हणाला,“माझ्या व्यक्तिरेखेचं नाव अभिजीत थोरात आहे. ही व्यक्ती साताऱ्यात लहानाची मोठी झाली आहे. अत्यंत बिनधास्त, बेफिकीर, कोणालाही न जुमानणारा, खूप हुशार, कोणतंही काम करून देणारा आणि आईवर प्रचंड प्रेम करणारा असा हा अभिजीत आहे. झी मराठीसोबत काम करण्याची इच्छा खूप वर्ष पासून होतीच. अनेक शोसाठी होता होता राहिलं. पण या मालिकेसाठी जेव्हा कॉल आला, तेव्हा असं वाटलं की उशिरा का होईना, एक उत्तम प्रोजेक्ट मिळाला. कॉल आला तेव्हा एकाच फोनमध्ये मी होकार दिला. कारण इतकं उत्तम पात्र आणि भूमिका मिळणं हे नशीबच आहे.
काही भूमिका आपल्याला खूप काही शिकवत असतात. ही भूमिकाही तशीच आहे. भूमिकेच्या तयारीबद्दल सांगायचं झालं तर सगळ्यात आधी सातारी भाषा, तिचा लहेजा आणि बोलण्याची ढब शिकलो. सध्या शूटिंगसुद्धा साताऱ्यातच सुरू असल्यामुळे इथल्या लोकांचं निरीक्षण करतोय. त्याचा या व्यक्तिरेखेसाठी नक्कीच फायदा होतोय.आतापर्यंत केलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका नक्कीच वेगळी आहे, कारण असा रोल मी याआधी कधीच केला नाहीये. गावाकडचा रोल केला असला तरी गावचा रांगडेपणा आणि स्वॅग असलेली भूमिका पहिल्यांदाच करायला मिळतेय. त्याचबरोबर या पात्राच्या खूप वेगवेगळ्या छटा आहेत. खरंतर मी अशा भूमिकेसाठी इतकी वर्षं थांबलो होतो. मी मनापासून आभार मानतो की मला ही भूमिका करण्याची संधी दिली. जवळपास दोन वर्षांनंतर मी पुन्हा टेलिव्हिजनवर दिसणार आहे आणि तेही याआधी कधीही न केलेल्या व्यक्तिरेखेतून. सुरुवातीला थोडी धाकधूक होती की प्रेक्षक मला अशा भूमिकेत स्वीकारतील का? पण प्रोमोला मिळालेला प्रतिसाद पाहून खूप बरं वाटलं. आतापर्यंत केलेल्या शोजपैकी सगळ्यात छान प्रतिसाद या प्रोमोला आणि माझ्या व्यक्तिरेखेला मिळतोय.
जसं मी सांगितलं, याआधी असा रोल मी कधीच केला नव्हता. त्यात ज्या मोठ्या स्तरावर प्रोमोचं शूटिंग झालं, तोसुद्धा माझ्यासाठी पहिलाच अनुभव होता. हे शूट करताना मला खूप मजा आली. प्रोमोमध्ये माझ्या व्यक्तिरेखेची एन्ट्री JCB वर डान्स करताना दाखवली आहे. त्यासाठी मी जवळपास दीड तास JCB वर मनसोक्त नाचत होतो!”
हर्षदची दोन वर्षांनंतरची छोट्या पडद्यावरची पुनरागमनाची ही वेळ आणि त्याची आजवर कधीही न पाहिलेली भूमिका यामुळे प्रेक्षकांमध्ये या मालिकेबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. तेव्हा पाहायला विसरू नका, ‘येतेच आता मी नांदायला’, ३० नोव्हेंबरपासून सोम – शुक्र रात्री १० वा. फक्त आपल्या झी मराठीवर !