
मुंबई : 7 सप्टेंबर 2023 | अभिनेत्री हेमा मालिनी गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय नाहीत. पण अभिनेते आणि पती धर्मेंद्र यांनी ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमात भूमिका साकारल्यानंतर हेमा मालिनी यांनी देखील बॉलिवूडमध्ये पुन्हा पदार्पण करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे तर कायम चर्चेत असतात. पण त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल देखील अनेक गोष्टी आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी सर्व मर्यादा ओलांडून, समाजाच्या विरोधात जावून लग्न केलं. विवाहित अभिनेत्यासोबत लग्न केल्यामुळे हेमा मालिनी यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला.
अभिनेत्री हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत १९८० मध्ये लग्न केलं. धर्मेंद्र विवाहित असल्यामुळे पुन्हा विवाहबंधनात अडकू शकत नव्हते. म्हणून त्यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार करत हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. लग्नाला ४३ वर्ष झाली असली तरी, हेमा मालिनी यांनी आजही पतीच्या जुन्या घरी पाऊल ठेवलं नाही.
दरम्यान, जेव्हा हेमा मालिनी प्रग्नेंट असल्याचं कळताच अभिनेत्रीला भेटण्यासाठी धर्मेंद्र यांच्या आई सतवंत कौर स्टुडिओमध्ये पोहोचल्या होत्या. तेव्हा सासूबाईंना पाहिल्यानंतर हेमा मालिनी यांनी त्यांचा आशीर्वाद घेतला. तेव्हा मुलाच्या दुसऱ्या पत्नीला मिठी मारत सतवंत कौर, हेमा मालिनी यांना ‘आनंदी राहा…’ असं म्हणाल्या…
हेमा मालिनी आजही धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबापासून दूर असतात. एवढंच नाही तर, अभिनेते सनी देओल यांचा मुलगा करण देओल याच्या लग्नात देखील हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली आल्या नव्हत्या. पण अभिनेत्री ईशा देओल हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून करण देओल याला लग्नाच्या शुभच्छा दिल्या…
पण ‘गदर २’ सिनेमाच्या लोकप्रियते नंतर देओल कुटुंबातील मुलं एकत्र दिसली. ईशा देओल हिने ‘गदर २’ सिनेमासाठी स्क्रिनिंगचं आयोजन केलं होतं. तेव्हा सनी देओल, बॉबी देओल, ईशा देओल आणि अहाना देओल यांना एकत्र पाहिल्यानंतर धर्मेंद्र यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला होता.