Housefull 5 Review : कॉमेडीचाच ‘मर्डर’, डझनभर कलाकार तरी तशी मजा नाहीच!

'हाऊसफुल 5' हा कॉमेडी चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कलाकारांची मांदियाळी असलेला हा चित्रपट थिएटरमध्ये पहावा की पाहू नये या संभ्रमात असाल, तर आधी हा संपूर्ण रिव्ह्यू नक्की वाचा..

Housefull 5 Review : कॉमेडीचाच मर्डर, डझनभर कलाकार तरी तशी मजा नाहीच!
Housefull 5
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 06, 2025 | 4:36 PM

अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, जॅकी श्रॉफ, संजय दत्त, नाना पाटेकर, रितेश देशमुख आणि त्यांसारख्या सुमारे डझनभर आणखी कलाकारांची भूमिका असलेला ‘हाऊसफुल 5’ हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. निर्माते साजिद नाडियादवाला यांच्या या बहुचर्चित कॉमेडी फ्रँचाइजीमुळे पुन्हा एकदा कलाकारांची मांदियाळी पहायला मिळत आहे. कॉमेडीसोबतच यंदा कथेत मर्डर मिस्ट्रीचीही फोडणी घालण्यात आली आहे. त्यावरही उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी दोन-दोन क्लायमॅक्स (हाऊसफुल 5A आणि हाऊसफुल 5B) प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. परंतु इतक्या सगळ्या गोष्टींचा भडीमार असतानाही मूळ गोष्ट विसरले की आजच्या काळात कथेला अधिक महत्त्व आहे. जवळपास दीड डझन सेलिब्रिटींच्या यात भूमिका असूनही ते या चित्रपटात एक वेगळी चमक आणण्यात अपयशी ठरतात.

चित्रपटाची कथा

या चित्रपटाची कथा आणि पटकथा साजिदा नाडियादवाला यांनी लिहिली आहे. तर तरुण मनसुखानी आणि फरहाद सामजी यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. या कथेनुसार, एक अब्जाधीश बिझनेसमन रंजीत डोबरियाल (रंजीत) एका आलिशान जहाजावर त्याचा 100 वा वाढदिवस साजरा करायला जातो. परंतु सेलिब्रेशन सुरू होण्याआधीच त्याचा मृत्यू होतो. त्याचसोबत खुलासा होतो की मृत्यूपूर्वी त्यांनी त्यांची सगळी संपत्ती त्यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा जॉलीच्या नावावर केली आहे. हा जॉली त्या वाढदिवसाच्या पार्टीत उपस्थित राहणार होता.

अब्जाधीशांच्या संपत्तीवर दावा करण्यासाठी जेव्हा एक नाही तर तीन-तीन जॉली समोर येतात तेव्हा मोठा गोंधळ उडतो. जलाबुद्दीन ऊर्फ जॉली (रितेश देशमुख), जलभूषण ऊर्फ जॉली (अभिषेक बच्चन) आणि ज्युलिएस ऊर्फ जॉली (अक्षय कुमार) हे तिघं संपत्तीसाठी जहाजावर येतात. अशातच रंजीतच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा देव (फरदीन खान) हा खऱ्या जॉलीला ओळखण्यासाठी डॉक्टरांना तिघांचे डीएनए टेस्ट करायला सांगतो. परंतु रिपोर्ट येण्याआधीच डॉक्टरचाही मृत्यू होतो. त्यामुळे खरा आरोपी हा जहाजावर उपस्थित असलेल्यांपैकीच एक असल्याचं स्पष्ट होतं. पण तो आहे तरी कोण? हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट पहावा लागेल. त्यातही गोंधळ असा आहे की या चित्रपटाचे एक नाही तर दोन क्लायमॅक्स आहेत. त्यामुळे हाऊसफुल 5 A आणि हाऊसफुल 5 B यातील आरोपी वेगवेगळे असू शकतात.

रिव्ह्यू

‘हाऊसफुल’ फ्रँचाइजी ही ओव्हर द टॉप कॉमेडी आणि भूमिकांच्या गोंधळामुळे होणारं मनोरंजन यासाठी ओळखली जाते. यंदासुद्धा त्याच घटकांच्या आधारे प्रेक्षकांना हसवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु एकच गोष्ट सतत दाखवल्यामुळे त्यातील विनोदसुद्धा हसवण्यात अपयशी ठरतो. त्यातील अभिनेत्रींसाठी वापरण्यात आलेले दुहेरी अर्थाचे जोक्ससुद्धा अश्लील वाटतात. या चित्रपटाचा स्क्रीनप्ले गाण्यांच्या भडीमाराने ओढून-ताणून वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. ‘कयामत’, ‘लाल परी’ आणि ‘फुगडी डान्स’ यांसारखी गाणी जरी चांगली वाटत असली तरी एकानंतर एक होणाऱ्या मर्डरदरम्यान अचानक गाणी सुरू झाल्याने कथेचीही मजा निघून जाते.

अक्षय कुमार, रितेश देशमुख यांनी त्यांच्या कॉमिक स्टाइलने प्रेक्षकांना हसवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. तर जॅकी श्रॉफ आणि संजय दत्त हे ओव्हर अॅक्टिंग करूनही आपली विशेष छाप सोडून जातात. जॅकलिन फर्नांडिस, सोनम बाजवा, नरगिस फाखरी, सौंदर्या शर्मा, चित्रांगदा सिंह या अभिनेत्री केवळ कथेतील ग्लॅमर वाढवण्यात यशस्वी ठरतात. अभिनयात या सगळ्यांमध्ये दमदार ठरतात ते नाना पाटेकर. त्यांच्या उपस्थितीनेच तो सीन इतरांपेक्षा वेगळा ठरतो. तर व्ही. मणिकंदन यांची सिनेमॅटोग्राफीसुद्धा उल्लेखनीय आहे. त्यातील समुद्र आणि क्रूजमधील भव्य दृश्य आकर्षक ठरतात.

वेळ घालवण्यासाठी तुम्हाला जर एखादा चित्रपट पहायचा असेल तर तुम्ही हाऊसफुल A किंवा हाऊसफुल B पाहू शकता. कारण या दोन्ही चित्रपटांची कथा पूर्णपणे एकसारखीच आहे, फक्त त्यांचा क्लायमॅक्स वेगवेगळा आहे.