Hrithik Roshan: माझ्या मुलांची आई म्हणून तू..; पूर्व पत्नी सुझानसाठी हृतिक रोशनची पोस्ट, गर्लफ्रेंड सबाच्या कमेंटने वेधलं लक्ष
Hrithik Roshan- Sussanne Khan: अभिनेता हृतिक रोशनने त्याची पूर्व पत्नी सुझान खानसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. त्याच्या या पोस्टवर गर्लफ्रेंड सबा आझादनेही प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूडचा हँडसम हंक हृतिक रोशन सध्या त्याच्या एका खास सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आला आहे. हतिकने त्याची पूर्व पत्नी आणि इंटेरिअर डिझायनर सुझान खान हिच्यासाठी वाढदिवसानिमित्त एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने सुझानचं भरभरून कौतुक करत तिच्या आयुष्यातील संघर्ष, तिचं व्यक्तिमत्त्व आणि मुलांसाठी ती करत असलेल्या गोष्टींचं विशेष कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे, हृतिकची गर्लफ्रेंड सबा आझाद हिनेही या पोस्टवर हार्ट इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे हृतिक, सुझान आणि सबा यांच्यातील नात्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
सुझान खानचा 26 ऑक्टोबर रोजी वाढदिवस होता. त्यानंतर दोन दिवसांनी, म्हणजेच 28 ऑक्टोबरला हृतिकने सोशल मीडियावर तिच्यासाठी खास शुभेच्छा दिल्या. त्याने सुझानचे काही जुने आणि न पाहिलेले फोटो शेअर केले. यातील काही फोटोंमध्ये सुझान तिच्या दोन्ही मुलांसोबत दिसत आहे, तर काहींमध्ये हृतिक आणि सुझान मुलांसोबत आनंदाचे क्षण घालवताना दिसतात. या फोटोंसोबत हृतिकने लिहिलेला संदेश चाहत्यांच्या मनाला भावला. सुझानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्याने तिच्या आयुष्यात प्रेम, आनंद, आपुलकी आणि जादुई क्षणांची भर पडावी, अशी इच्छा व्यक्त केली. आयुष्यात आलेल्या आव्हानांना तिने ज्या पद्धतीने सामोरं जात स्वतःला घडवलं, त्याचा आपल्याला अभिमान असल्याचंही हृतिकने सांगितलं.
पहा हृतिकची पोस्ट
हृतिकने सुझानचं कौतुक करताना तिला आपल्या दोन्ही मुलांची सर्वोत्तम आई म्हटलं आहे. रे आणि रिद्झ यांच्या आयुष्यात सुझान सकारात्मक ऊर्जा निर्माण करते, याचा आपल्याला आनंद असल्याचं त्याने सांगितलं. सुझानच्या आईचा चांगुलपणा तिच्यामध्ये दिसतो, असंही हृतिकने आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं. सुझानच्या व्यावसायिक यशासाठीही हृतिकने शुभेच्छा दिल्या. तिचा ‘द चारकोल प्रोजेक्ट’ हा डिझाइन व्यवसाय जगभरातील अनेक शहरांमध्ये पोहोचावा, अशी इच्छा त्याने व्यक्त केली. पोस्टच्या शेवटी हृतिकने लिहिलं की, ‘मी नेहमी तुझ्यासोबत असेन आणि तुला प्रोत्साहन देत राहीन.’ त्याच्या या शब्दांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
हृतिकच्या या पोस्टवर त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद हिने हार्ट इमोजी शेअर केले. सुझानचा बॉयफ्रेंड अर्सलान गोणी यानेही हार्ट इमोजीद्वारे प्रतिक्रिया दिली. यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये या पोस्टची चर्चा रंगली आहे. हृतिक आणि सुझान यांचं लग्न 2000 मध्ये झालं होतं. जवळपास 14 वर्षांच्या संसारानंतर 2014 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. या नात्यातून त्यांना रेहान आणि रिदान ही दोन मुलं आहेत. विभक्त झाल्यानंतरही दोघांनी मुलांसाठी एकत्र पालकत्वाची जबाबदारी पार पाडली आहे.