‘धुरंधर’सारखा चित्रपट बनवणं सर्वांत मोठा मूर्खपणा..; प्रसिद्ध दिग्दर्शकाचं वक्तव्य चर्चेत

धर्मेंद्र यांचा शेवटचा 'इक्कीस' हा चित्रपट 1 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सिमर भाटिया आणि जयदीप अहलावत यांच्याही भूमिका आहेत.

धुरंधरसारखा चित्रपट बनवणं सर्वांत मोठा मूर्खपणा..; प्रसिद्ध दिग्दर्शकाचं वक्तव्य चर्चेत
Dhurandhar and Ikkis movie
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 30, 2025 | 8:32 PM

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाचं सर्वत्र कौतुक होत आहे. यादरम्यान ‘इक्कीस’ या चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी म्हटलं की ‘धुरंधर’ हा त्यांच्या प्रकारचा चित्रपट नाही. त्यांना आदित्य धरची शैली फॉलो करायची नाही आणि ‘धुरंधर’सारखा चित्रपट बनवणं हे मूर्खपणाचं काम असेल, असं देखील त्यांनी म्हटलंय. ‘द हिंदू’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीदरम्यान श्रीराम राघवन यांना विचारण्यात आलं की, ‘धुरंधर’ आणि त्यांचा भाऊ श्रीधर राघवन यांनी बनवलेल्या स्पाय चित्रपटांमध्ये काळ फरक आहे? त्यावर ते म्हणाले, “हा एक उत्तम चित्रपट आहे, ज्यामध्ये कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. परंतु तो आमच्या प्रकारचा चित्रपट नाही.

याविषयी श्रीराम राघवन पुढे म्हणाले, “आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की आपण एका वेगळ्या युगात राहतो. शॉन कॉनरी आणि रॉजर मूर अभिनित जेम्स बाँडचे सुरुवातीचे चित्रपट मनोरंजक होते. नंतर बाँडचे चित्रपट अधिक गंभीर झाले. ‘धुरंधर’ हा एक वेगळ्या प्रकारचा चित्रपट आहे. तो बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट कामगिरी करतोय आणि करायलाही हवा. पण तो एकमेव फॉरमॅट नाही. जर मी त्याचं अनुकरण केलं तर ते करणं सर्वात मूर्खपणाचं काम ठरेल. आदित्य धर आणि मी राष्ट्रीय पुरस्कारांचं व्यासपीठ शेअर केलं होतं, जेव्हा त्याने ‘उरी’ हा चित्रपट बनवला होता आणि मी ‘अंधाधून’ हा चित्रपट बनवला होता. त्याची संवेदनशीलता आणि कलात्मकता वेगळी आहे आणि मला त्याचे चित्रपट पहायला आवडतं. पण त्याच्यासारखे चित्रपट मी बनवणार नाही.”

श्रीराम राघवानी यांनी दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्यासोबत काम करण्याचाही अनुभव पुढे सांगितला. ते म्हणाले, “धरमजींसोबत अभिनयाचा कोणताही मागमूसच नव्हता. म्हणजे त्यांचं वर्तन, त्यांची शैली हे सर्व काही त्या पात्राचा भागच होते. ते कथेशी खोलवर जोडले गेले होते. पंजाबमधील त्यांचं घर सोडण्याचं दुःख त्यांच्या मनात वर्षानुवर्षे रुजलं होतं. घरी परतण्याचा विचार त्यांच्यासाठी एक खोल वैयक्तिक अनुभव बनला. त्या पात्रात ते पूर्णपणे बुडाले होते. ते अक्षरशः ते पात्र जगत होते.

याविषयी ते पुढे म्हणाले, “त्यांना संवादांची सखोल समज होती आणि ते कमी शब्दांच्या वापराला अधिक महत्त्व देत होते. मी त्यांना संवाद लिहून दिले पण ते कसे म्हणायचे याबद्दल ते नेहमी माझा सल्ला विचारायचे. त्यात ते कधी स्वतःहून बदल करायचे आणि चित्रपटात मी त्यांनी सुचवलेल्या अनेक ओळी वापरल्यासुद्धा आहेत. आम्ही अनेकदा त्यांच्या कवितांवर चर्चा करायचो. मला त्यांच्या कविता प्रकाशित करायच्या होत्या, पण त्यांना घाई नव्हती. मी त्यांना चित्रपटासाठी त्यांची एक रचना वाचून दाखवण्याची विनंती केली आणि ते खूप सुंदर होतं.