बंगला सोडला, कोट्यवधींची फरारी विकली, इंडस्ट्रीपासून दूर गेला.. घटस्फोटानंतर काय करतोय हा स्टारकिड?

इमरान खानने बालमैत्रीण अवंतिका मलिकशी 2011 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या आठ वर्षांनंतर 2019 मध्ये हे दोघं विभक्त झाले. या दोघांना एक मुलगी आहे. तर 2021 पासून इमरान आणि लेखाच्या अफेअरची चर्चा रंगतेय. या दोघांनी ‘मटरू की बिजली का मन डोला’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं.

बंगला सोडला, कोट्यवधींची फरारी विकली, इंडस्ट्रीपासून दूर गेला.. घटस्फोटानंतर काय करतोय हा स्टारकिड?
प्रसिद्ध स्टारकिडने घटस्फोटानंतर बंगला सोडला, गाडी विकली
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 07, 2024 | 9:05 AM

मुंबई: 7 फेब्रुवारी 2024 | बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना रातोरात प्रसिद्धी मिळाली. मात्र ही प्रसिद्धी फार काळ टिकली नाही. अचानक हे कलाकार पडद्यापासून दूर गेले. कधी चांगल्या चित्रपटांचे ऑफर्स न मिळाल्याने तर कधी खासगी आयुष्यामुळे हे सेलिब्रिटी लाइमलाइटपासून दूर ढकलले गेले. असाच एक सेलिब्रिटी म्हणजे अभिनेता इमरान खान. 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाने तू या जाने या’ चित्रपटातून त्याने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली. त्यानंतरही तो काही चित्रपटांमध्ये झळकला, मात्र अपेक्षित असं यश त्याला मिळालं नाही. सध्या इमरान त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.

‘वोग इंडिया’ या मासिकाला त्याने नुकतीच मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्याने साधं जीवन जगण्याची इच्छा बोलून दाखवली. यासाठी त्याने पाली हिलमधील त्याचा आलिशान बंगला सोडून दिला आहे. इतकंच नव्हे तर त्याने कोट्यवधी रुपयांची फरारीसुद्धा त्याने विकली आहे. सध्या इमरान त्याच्या मुलीच्या संगोपनासाठी पूर्ण वेळ देत आहे. याविषयी इमरान म्हणाला, “2016 हा माझ्यासाठी कसोटीचा काळ होता. त्यावेळी मी पूर्णपणे खचलो होतो. सुदैवाने मी एका अशा इंडस्ट्रीत काम करत होतो, जिथे मला आर्थिक बळ मिळालं. म्हणूनच जेव्हा मी 30 वर्षांचा झालो, तेव्हा मला पैशांविषयी फारशी चिंता करावी लागली नाही. त्यावेळी मी माझ्या करिअरसाठी फारसा उत्सुकसुद्धा नव्हतो.”

ज्या ज्या गोष्टी गरजेच्या नाही वाटल्या, त्यांपासून हळूहळू दूर गेल्याचं इमरानने सांगितलं. “मी नुकताच पिता बनलो आणि माझ्यासाठी ही फार मोलाची गोष्ट आहे. वडील म्हणून मला माझ्या जबाबदारीत कुठेच कमी पडायचं नाही. मुलगी इमारासाठी मला सर्वोत्तम व्यक्ती बनायचं आहे. आता अभिनेता बनणं हे माझं उद्देश नाही. मला स्वत:ला एक माणूस म्हणून बदलायचं आहे. माझ्या मुलीसाठी मला निरोगी आणि मजबूत बनायचं आहे”, असं तो पुढे म्हणाला.

इमरान हा अभिनेता आमिर खानचा भाचा आहे. बऱ्याच काळापासून तो चित्रपटांपासून दूर आहे. मात्र इमरान त्याच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत येतो. गेल्या काही महिन्यांपासून इमरानच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा होती. पत्नी अवंतिका मलिकला घटस्फोट दिल्यानंतर आता त्याच्या आयुष्यात एका खास व्यक्तीची एण्ट्री झाली आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री लेखा वॉशिंग्टनला तो डेट करत असल्याचं कळतंय.