
ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT) नेहमीच काहीतरी नवीन आणि आकर्षक पाहायला मिळतं. कधी हलकी-फुलकी कॉमेडी सीरिज, कधी हॉरर चित्रपट, तर कधी थरारक कथा! पण आज आम्ही तुम्हाला एका अशा क्राइम डॉक्युमेंट्रीबद्दल सांगणार आहोत, जी खऱ्याखुऱ्या घटनेवर आधारित आहे आणि तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. ही डॉक्युमेंट्री फक्त अंगावर शहारे आणत नाही, तर समाजातील एक भयावह सत्य उलगडते. ही आहे एका पोलिसाची कथा, जो समाजाचं रक्षण करणारा म्हणून ओळखला जायचा, पण प्रत्यक्षात तो एक क्रूर आणि निर्दयी होता. या तीन भागांच्या डॉक्युमेंट्रीतून त्याचा खरा चेहरा समोर येतो, जो तुम्हाला हादरवून सोडेल.
पोलिसांवरील विश्वासाला तडा
समाजात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची असते. त्यामुळे लोकांना पोलिसांवर विश्वास वाटतो. ‘पोलीस आहेत, म्हणजे आपण सुरक्षित आहोत’, असं प्रत्येकाला वाटतं. पण कधीकधी हेच रक्षक समाजासाठी धोकादायक ठरू शकतात. जर तुम्हाला यावर विश्वास बसत नसेल, तर नेटफ्लिक्सवरील ही तीन भागांची क्राइम डॉक्युमेंट्री पाहिल्यानंतर तुमचा विचार बदलू शकतो. ही खऱ्या घटनांवर आधारित सीरिज आहे, जी एका पोलिसाच्या भयावह कृत्यांचा पडदा फाश करते.
डॉक्युमेंट्रीचं नाव आणि कथा
आम्ही ज्या क्राइम डॉक्युमेंट्रीबद्दल बोलत आहोत, तिचं नाव आहे ‘इंडियन प्रीडेटर: बीस्ट ऑफ बंगलोर’. ही कथा आहे उमेश रेड्डी नावाच्या एका पोलिस कॉन्स्टेबलची. तो दिवसा पोलिसांच्या गणवेशात समाजाचं रक्षण करत असल्याचं भासवायचा, पण रात्री त्याच गणवेशाच्या आड त्याची क्रूर आणि भयानक बाजू समोर यायची. उमेश रेड्डी हा एक सीरिअल किलर, बलात्कारी आणि खुनी होता. तो एकट्या राहणाऱ्या महिलांना लक्ष्य करायचा, त्यांचा पाठलाग करायचा, त्यांच्या घरात घुसायचा, त्यांच्यावर बलात्कार करायचा आणि नंतर त्यांची हत्या करायचा.
थरारक सादरीकरण आणि खरी मुलाखती
‘इंडियन प्रीडेटर: बीस्ट ऑफ बंगलोर’ ही डॉक्युमेंट्री उमेश रेड्डीच्या क्रूर कृत्यांना थरारक पद्धतीने सादर करते. यात पोलिस, पत्रकार आणि या प्रकरणाशी संबंधित इतर व्यक्तींच्या खऱ्या मुलाखतींचा समावेश आहे. काही दृश्यांमध्ये क्राइम सीनचं पुनर्निर्माण (रि-क्रिएशन) केलं आहे, तसंच कोर्ट केसचे तपशीलही दाखवण्यात आले आहेत. या नराधमाने तब्बल 18 महिलांवरील बलात्कार आणि हत्येची कबुली दिली, त्यापैकी नऊ प्रकरणांमध्ये तो दोषी ठरला. 2002 मध्ये त्याला अटक झाली आणि सुरुवातीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, नंतर ही शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली.