Isha Keskar: मी कोणाची सून होणार नाही.., लग्नाबद्दल ईशा केसकर स्पष्टच बोलली; ही माझी अरेरावीच..
लग्न, लिव्ह इन रिलेशनशिप यांविषयी अभिनेत्री ईशा केसकरने तिचं रोखठोक मत मांडलं आहे. अभिनेता ऋषी सक्सेनासोबत ती गेल्या नऊ वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे.

अभिनेत्री ईशा केसकर तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. अभिनेता ऋषी सक्सेनासोबतचं तिचं नातं जगजाहीर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. ईशा आणि ऋषी लग्न कधी करणार, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. यावर एका मुलाखतीत खुद्द ईशानेच स्पष्ट उत्तर दिलं आहे. “मी कोणाची तरी मुलगी होईन, मी दत्तक जाईन पण कोणाची सून होणार नाही. मला हे म्हणतानाच आता कसंतरी वाटतंय. पण हे असंच आहे. मी एकवेळ घरजावई आणेन, पण मला स्वत:चं घर सोडून दुसऱ्याच्या घरी जायचं नाही.. ही संकल्पनाच पटत नाही,” असं ईशा म्हणाली.
लग्नाबद्दलचे विचार मांडताना ती पुढे म्हणाली, “आम्ही दोघं एकत्र येत असताना आमच्या आजूबाजूला अनेक घटस्फोट घडत होते. त्यांचं सर्व आयुष्य असं रस्त्यावर आलं होतं.. कोर्टात आरोप-प्रत्यारोप.. ते सगळं पाहणंच खूप कठीण होतं. आपली जनरेशन खूप उथळ आहे. आपण महिन्याला बॉयफ्रेंड बदलू, फरक पडत नाही. पण आईवडिलांचा कोण विचार करणार? मी दहा-बारा वर्षांची असल्यापासून मला ना आईने ना वडिलांनी असं सांगितलं की किंवा जाणवू दिलं की तुला उद्या लग्न करून दुसऱ्याच्या घरी जायचं आहे, तुला कोणाची तरी सून व्हायचं आहे, आई व्हायचं आहे. त्यामुळे माझ्यात त्या भावनाच नाहीत. मी कोणाची तरी मुलगी होईन, मी दत्तक जाईन पण कोणाची सून होणार नाही. मला हे म्हणतानाच आता कसंतरी वाटतंय. पण हे असंच आहे. मी एकवेळ घरजावई आणेन, पण मला स्वत:चं घर सोडून दुसऱ्याच्या घरी जायचं नाही.. ही संकल्पनाच पटत नाही.”
“मी आणि ऋषी गेल्या नऊ वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहोत. काहीच वेगळं वाटत नाही. परवा आम्ही एनिव्हर्सरी विसरलो होतो. लग्न यासाठी करावं की तुम्हाला एनिव्हर्सरी लक्षात राहील, तो एक सोहळा होतो, सगळे जवळचे एकत्र येतात. माझ्या आजूबाजूला अशी एकही स्त्री अशी नाही, जी माझ्यासारखी असेल. त्यामुळे माझ्या आजूबाजूच्या बहिणी, भावंडं जेव्हा मला विचारतात की, काय मग लग्न कधी? तेव्हा मी त्यांना असं विचारते की, तुमच्या आजूबाजूला एखादी स्त्री अशी नको का, की जी तिच्या अटीशर्तींवर आयुष्य जगतेय. प्रत्येक व्यक्ती एकाच चौकटीतून असू शकत नाही. कोणाला तरी वेगळं असावं लागतं. माझ्या वैयक्तिक आयुष्याने मला तशी संधी दिली आणि मला इतरांपेक्षा वेगळं बनवलं,” अशी प्रतिक्रिया ईशाने ‘राजश्री मराठी’शी बोलताना दिली.
“मी अभिनयक्षेत्रात काम करते म्हणून मी वेगळी आहे, अशातला भाग नाही. मी लहानपणापासूनच थोडीशी वेगळी, थोडी एकलकोंडी होते, माझ्या आवडीनिवडी वेगळ्या होत्या. मी माझं आयुष्य माझ्या अटीशर्तींवर जगतेय आणि मी अशीच खूप खुश आहे. ही माझी अरेरावी आहे की मी अशीच जगणार आहे,” अशी रोखठोक भूमिका ईशाने मांडली.