जॅकलिन फर्नांडिसला बेल की जेल? तणावात व्यतित करावे लागणार चार दिवस

200 कोटींच्या खंडणी प्रकरणी जॅकलिनच्या जामिनावर मंगळवारी लागणार निकाल

जॅकलिन फर्नांडिसला बेल की जेल? तणावात व्यतित करावे लागणार चार दिवस
Jacqueline Fernandez
Image Credit source: ANI
| Updated on: Nov 11, 2022 | 4:47 PM

दिल्ली- 200 कोटींच्या खंडणी प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा अंतरिम जामीन 15 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. दिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टात याप्रकरणी सुनावणी सुरू होती. तिहार तुरुंगातील आरोपी सुकेश चंद्रशेखरच्या खंडणी प्रकरणात जॅकलिनचं कनेक्शन समोर आलं होतं. गुरुवारी सुनावणी झाल्यानंतर कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. आता 15 नोव्हेंबर रोजीच जामिनाचा आदेश सुनावण्यात येणार आहे.

जॅकलिनकडून जामिनाचा अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र या जामिनाला ईडीकडून विरोध करण्यात आला होता. जामिन मिळाल्यास जॅकलिन देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करू शकते, असा आरोप ईडीने लावला.

“आम्ही आमच्या संपूर्ण आयुष्यात 50 लाख रुपये रोख पाहिले नाहीत, परंतु जॅकलिनने मौजमजेसाठी 7.14 कोटी रुपये उडवले. तिने प्रत्येक युक्ती वापरून पळून जाण्याचा प्रयत्न केला आहे. कारण त्यासाठी तिच्याकडे पुरेसे पैसे आहेत,”, असं ईडीने कोर्टात म्हटलंय.

“जॅकलिनला आतापर्यंत अटक का केली नाही? इतर आरोप तुरुंगात आहेत, मग अशावेळी अभिनेत्रीला का अटक केली नाही”, असा सवाल कोर्टाने यावेळी ईडीला केला.

200 कोटींच्या खंडणी प्रकरणात ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात जॅकलिनचा उल्लेख आरोपी असा केला आहे. खंडणीतून मिळालेल्या पैशांचा फायदा जॅकलिनने घेतला, असं त्यात म्हटलं गेलंय. तर मी आरोपी नसून पीडित असल्याचं जॅकलिनने म्हटलं आहे.

“जॅकलिनने तपासात कधीच सहकार्य केलं नाही. पुरावे सादर केले तेव्हाच खुलासा केला. ती पुरावे आणि साक्षीदारांशी छेडछाड करू शकते. याप्रकरणी जेव्हा तिला इतर आरोपींसमोर बसवून प्रश्न विचारले गेले, तेव्हाच तिने कबुली दिली”, असंही ईडीने म्हटलंय.