‘नाटू नाटू’च्या ऑस्कर विजयावर जॅकलिन फर्नांडिसच्या जवळच्या व्यक्तीने केला गंभीर आरोप, भडकले नेटकरी

| Updated on: Mar 17, 2023 | 9:41 AM

'नाटू नाटू' या गाण्यासाठी संगीतकार एम. एम. किरवाणी आणि गीतकार चंद्रबोस यांनी पारितोषिक स्वीकारलं. तर दिग्दर्शिका कार्तिकी गोन्साल्विस आणि निर्मात्या गुनीत मोंगा यांना 'द एलिफंट व्हिस्परर्स' या माहितीपटासाठी गौरविण्यात आलं.

नाटू नाटूच्या ऑस्कर विजयावर जॅकलिन फर्नांडिसच्या जवळच्या व्यक्तीने केला गंभीर आरोप, भडकले नेटकरी
RRR टीमवर ऑस्कर विकत घेतल्याचा आरोप
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात जेव्हा RRR या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने विजय मिळवला, तेव्हा संपूर्ण देशभरात जल्लोष साजरा करण्यात आला. ज्युनियर एनटीआर आणि रामचरण यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला फक्त देशातच नाही तर जगभरात तुफान प्रतिसाद मिळाला. युट्यूब, इन्स्टाग्राम, टिकटॉक सर्वत्र या गाण्यावरील डान्सचे व्हिडीओ व्हायरल होऊ लागले. ऑस्कर पुरस्कार जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह कलाविश्वातील असंख्य कलाकार, सामान्य प्रेक्षक यांनी टीमवर कौतुकाचा वर्षाव केला. मात्र आता अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या एका जवळच्या व्यक्तीने या गाण्याच्या विजयावर प्रश्न उपस्थित केला आहे.

जॅकलिन फर्नांडिसचा मेकअप आर्टिस्ट शान मित्तथुलने ‘नाटू नाटू’च्या पोस्टवर कमेंट करत टीका केली आहे. ‘मला वाटायचं की फक्त भारतातच पुरस्कार खरेदी केले जातात. पण आता मी पाहतोय की ऑस्करसुद्धा विकला गेलाय. सर्वकाही पैशांनीच होतं’, असा गंभीर आरोप त्याने या कमेंटद्वारे केला आहे.

काही दिवसांपूर्वीच तेलुगू दिग्दर्शक तमारेड्डी भारद्वाज यांनी RRR च्या बजेटवरून टिप्पणी केली होती. चित्रपटाच्या प्रचारासाठी तब्बल 80 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत, अशी टीका त्यांनी केली होती. याशिवाय अभिनेत्री अनन्या चॅटर्जीनेही ‘नाटू नाटू’वरून इतका गर्व का, असा प्रश्न उपस्थित केला होता. “मला समजत नाहीये की खरंच नाटू नाटूवर तुम्हाला इतका गर्व वाटला पाहिजे का? आपण कुठे जातोय”, असं ती म्हणाली होती.

हे सुद्धा वाचा

भारताला दोन ऑस्कर पुरस्कार

यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतासाठी खूपच खास ठरला. यावेळी एक नव्हे तर दोन पुरस्कार भारताने आपल्या नावे केले. ए. एस. राजामौली यांच्या RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या विभागात पुरस्कार पटकावला. तर ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या माहितीपटाने सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्रीच्या ऑस्कर पुरस्कारावर आपलं नाव कोरलं.

‘नाटू नाटू’ या गाण्यासाठी संगीतकार एम. एम. किरवाणी आणि गीतकार चंद्रबोस यांनी पारितोषिक स्वीकारलं. ‘कारपेंटर्स’ या अमेरिकन बँडची गाणी ऐकत आपण लहानाचे मोठे झालो, अशी माहिती किरवाणी यांनी पुरस्कार स्वीकारताना दिली. कारपेंटर्स बँडच्या ‘टॉप ऑफ द वर्ल्ड’ या गाण्याच्या चालीवर शब्द रचत त्यांनी पुरस्काराचा आनंद व्यक्त केला. या गाण्यावर ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात डान्स परफॉर्म कऱण्यात आला. त्याआधी अभिनेत्री दीपिका पदुकोण त्याविषयी सांगत असताना अख्खा प्रेक्षकवर्ग गाण्याचं कौतुक करताना दिसत होता.