सुकेश प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसला मोठा धक्का; न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश
सुकेश चंद्रशेखर प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस अडचणीत; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात खटला चालवण्याचे न्यायालयाचे आदेश

Jacqueline Fernandez : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिला सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटी रुपयांच्या कथित फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मोठा धक्का बसला आहे. दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने जॅकलिन फर्नांडिस, सुकेश चंद्रशेखर, त्याची पत्नी लीना मारिया पॉल आणि इतर 14 आरोपींविरुद्ध प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट अंतर्गत आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता जॅकलिनला या प्रकरणात न्यायालयीन खटल्याचा सामना करावा लागणार आहे.
पटियाला हाऊस न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले की, तपास यंत्रणांनी सादर केलेले पुरावे, कागदपत्रे आणि उपलब्ध तथ्यांचा प्राथमिक आढावा घेतल्यानंतर सर्व आरोपींविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचा गंभीर संशय निर्माण होतो. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसा आधार उपलब्ध असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
नेमके काय आहे 200 कोटी रुपयांचे प्रकरण?
अंमलबजावणी संचालनालय (ED) च्या तपासानुसार, सुकेश चंद्रशेखरने तुरुंगात असतानाही मोठे गुन्हेगारी जाळे चालवले होते. तो स्वतःला पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय गृह मंत्रालय किंवा कायदा मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवत असे. बनावट ओळखी, खोटे फोन कॉल, एन्क्रिप्टेड अॅप्स आणि विविध फसव्या पद्धतींचा वापर करून त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी 200 कोटी रुपयांहून अधिक रकमेची कथित उकळपट्टी आणि फसवणूक केल्याचा आरोप आहे.
तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, या बेकायदेशीर मार्गाने मिळवलेल्या पैशांचा वापर आलिशान मालमत्ता खरेदी करण्यासाठी, महागड्या गाड्या घेण्यासाठी आणि विविध व्यक्तींना लक्झरी भेटवस्तू देण्यासाठी करण्यात आला.
जॅकलिनला कोट्यवधींच्या भेटवस्तू?
ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात असा दावा करण्यात आला आहे की, सुकेश चंद्रशेखरने कथित गुन्हेगारी उत्पन्नातून जॅकलिन फर्नांडिसला सुमारे 5 कोटी 71 लाख रुपयांच्या महागड्या भेटवस्तू दिल्या. या भेटवस्तूंमध्ये दागिने, लक्झरी वस्तू आणि इतर मौल्यवान भेटींचा समावेश असल्याचे तपासात नमूद करण्यात आले आहे. या भेटवस्तू जॅकलिनपर्यंत पोहोचवण्यासाठी सुकेशने त्याची सहकारी पिंकी इराणीची मदत घेतल्याचा आरोपही ईडीने केला आहे.
ईडीचा दावा आहे की, सुकेश चंद्रशेखरचा गुन्हेगारी इतिहास माहिती असूनही जॅकलिनने त्याच्याकडून महागड्या भेटवस्तू स्वीकारल्या. एजन्सीच्या मते, तिने जाणीवपूर्वक त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे दुर्लक्ष केले आणि त्याच्याशी आर्थिक व्यवहार सुरू ठेवले. चौकशीदरम्यान भेटवस्तूंविषयी दिलेल्या जबाबांमध्ये जॅकलिनने अनेकदा बदल केल्याचा आरोपही ईडीने केला आहे. पुरावे समोर आल्यानंतर तिने काही बाबी मान्य केल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.