जेव्हा स्वामी रामाच्या अवतारात दर्शन देतात.. ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत रामनवमीचा अलौकिक उत्सव

एकूण तीन गोष्टींच्या माध्यमातून या रामनवमी विशेष सप्ताहात श्रद्धा, निष्ठा आणि सत्याचा विजय यांचा अनोखा संगम प्रेक्षकांना पहायला मिळेल. याचा आरंभ असलेला ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेचा हा रामनवमी विशेष भाग 6 एप्रिल दुपारी 1 आणि संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जेव्हा स्वामी रामाच्या अवतारात दर्शन देतात.. जय जय स्वामी समर्थ मालिकेत रामनवमीचा अलौकिक उत्सव
Jai Jai Swami Samarth
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 03, 2025 | 2:51 PM

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेत येत्या रविवारी 6 एप्रिल रोजी रामनवमी विशेष भाग प्रसारित होणार आहे. या भागात भक्तांना श्रद्धा, निष्ठा आणि स्वामी लीलांचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. रामनवमीच्या पवित्र पर्वावर स्वामीस्थानावर भक्तगण मोठ्या संख्येने एकत्र आले आहेत. गावकरी रामनवमीच्या निमित्ताने सजावट करताना दिसत आहेत. ज्यामध्ये मनोहर, वत्सला, उदय आणि इतर गावकरी सहभागी आहेत. याचवेळी हातात पूजेचे ताट घेऊन मीरा येताना दिसते. तिने सुवासिनीसारखा वेश परिधान केला आहे. मात्र, तिला पाहताच गावकऱ्यांमध्ये कुजबूज सुरू होते. यावेळी मोरोपंत स्पष्ट शब्दांत म्हणतो की, “विधवा स्त्रीने पूजा करणे धर्माला मान्य नाही!”

यावर मीरा ठाम उत्तर देते, “धर्म मनाने आणि श्रद्धेने मोठा असतो, बंधनांनी नाही!” तिच्या या उत्तराने वातावरण गंभीर होतं. वत्सला इतर महिलांना उद्देशून म्हणते, “बघता काय, हिसकावून घ्या तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र!” काही स्त्रिया तिच्या दिशेने धावतात. याच क्षणी, मीरा बाजूला पडलेली कुऱ्हाड पाहते आणि ती उचलते. अचानक ढगांचा गडगडाट होतो, सोसाट्याचा वारा सुटतो, वीज चमकते आणि त्या ठिकाणी स्वामी अवतरतात. संपूर्ण गाव अचंबित होऊन स्वामींकडे पाहते. मीरा स्वतःच्या हाताकडे पाहते, तर तिच्या हातात कुऱ्हाडीच्या जागी चाफ्याची फुले असतात.

मोरोपंत, वत्सला, उदय अवाक् होऊन स्वामींकडे पाहतात. गावकरी हात जोडतात. मीरा स्वतःच्या हातातील फुले स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि जेव्हा ती वर पाहते, तेव्हा स्वामी रामाच्या अवतारात तिला दिसतात. त्यांच्या तेजस्वी रूपाने सर्वांनाच स्तब्ध केलं. त्या दिव्य दृश्यामध्ये स्वामी मीराला आशीर्वाद देत म्हणतात, “सौभाग्यवती भवः…” याने संपूर्ण गाव अचंबित होतं. या स्वामी लीलेचा अर्थ काय हे मालिकेच्या आगामी भागात उलगडलं जाणार आहे.

याच भागापासून राम आणि सीतेच्या नात्याचा गूढ संदेश स्वामी उलगडतात. पती-पत्नीच्या नात्यात विश्वास किती महत्त्वाचा आहे, यावर त्यांनी भर दिला. याचवेळी, सत्यवान आणि कलावतीच्या संघर्षाची कथा उलगडण्याचा आरंभ होतो. सत्यवान अत्यंत धार्मिक नवरा असून कलावती त्याच्यावर निस्सीम प्रेम करणारी पत्नी आहे. त्यांच्या नात्यात येणाऱ्या अडचणी, समाजाने लावलेले आरोप आणि त्यातून मिळणारा स्वामींचा आशीर्वाद ही कथा प्रत्येकाला अंतर्मुख करणारी ठरेल.

केवळ राम आणि हनुमानाची पूजा करणारा अवधूत नावाचा मारुतीभक्त स्वामींच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं करतो. मात्र, त्याच्यावर आलेल्या संकटांमधून तो सत्य कसा जाणेल आणि स्वामींच्या चमत्कारिक लीलांमधून त्याला हनुमान तत्वाचा साक्षात्कार कसा होईल? त्याला स्वामींची प्रचिती कशी घडेल? हे आगामी भागात बघणं उत्सुकतेचं असणार आहे. दुसरीकडे स्वामींच्या कृपेने सत्यवान आणि कलावतीचा संसार पुन्हा कसा उभा राहतो, कलावतीचा उद्धार स्वामी कसा करतात, त्याला प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवनातील प्रसंगांचा कसा आधार असतो हा अत्यंत रंजक कथाभागही उलगडेल.