जॉनी लिव्हर यांचं आडनाव लावण्यास जेमीचा नकार का ? केला मोठा खुलासा
ज्येष्ठ कॉमेडियन जॉनी लिव्हर यांची लेक जेमी लिव्हरने 'लिव्हर' आडनावाच्या दबावाबाबत खुलासा केला. सुरुवातीला तिला हे आडनाव वापरायचे नव्हते, कारण तिला स्वतःची ओळख निर्माण करायची होती. वडिलांसोबत कोलकाता येथे स्टेज शेअर केल्यानंतर तिने हा अनुभव कथन केला. हा वारसा पुढे नेण्याची मोठी जबाबदारी वाटते, असेही ती म्हणाली.

दिग्गज कॉमेडिअन जॉनी लिव्हर माहीत नाही, असा माणूस विरळाच. हिंदी फिल्म इंडस्ट्रीत त्याने स्वत:चं एक खास स्थान निर्माण केलं आहे. आता त्याच्या घरातील दुसरी पिढीही, त्याच्या पावलावर पाऊल चाकून चालताना दिसत्ये. जॉनी लिव्हरची लेक, जेमी लिव्हर ही देखील वडिलांप्रमाणे खूप टॅलेंटेड आहे. जेमी खूप चांगली कॉमेडी करते. तसेच मिमिक्री करण्यात तिचा हात कोणीच धरू शकणार नाही. आता जेमीने, नुकताच वडील जॉनी लिव्हर यांच्यासोबत कोलकाता येथे स्टेज शेअर केला. दोघांनी एकत्र परफॉर्म केलं आणि माहोल एकद फ्रेश झालाय. आपल्या वडिलांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता, हेही जेमीने सांगितलं.
पण एवढंच नव्हे, तर संवाद साधताना जेमीने एक मोठा खुलासाही केला. एक काळ असा होता, व्हा तिला तिच्या नावामागे वडिलांचे आडनाव लावायचे नव्हतं. जेमीच्या मते, तिला स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची होती. ‘लिव्हर’ हे आडनाव एक मोठी जबाबदारी आहे आणि त्यामुळे मला दबावही जाणवतो, असं मत जेमीने मांडलं होतं.
काय म्हणाली जेमी लिव्हर ?
जेमी म्हणाली, “आजही मला असं वाटतं की, लिव्हर या आडनावाचा माझ्यावर खूप दबाव आहे. ही माझ्यासाठी खूप मोठी जबाबदारी आहे.” पुढे जेमीने सांगितलं की, सुरुवातीला तर तिला आपल्या व्यावसायिक नावासोबत वडिलांचं आडनाव लावायचंच नव्हतं. मात्र, जेव्हा ती कामासाठी निर्मात्यांना भेटायला जायची, तव्हा अनेकजण तिला विचारायचे की तू लिव्हर हे आडनाव का लावत नाहीस ? तू ज्येष्ठ अभिनेते जॉनी लिव्हर यांची मुलगी आहेस, हे लोकांना सांगायला हवं, असंही अनेक निर्माते तिला सुचवायचे.
पण जेमीच्या मते, “ ही खूप मोठी जबाबदारी आहे. मला माझी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची होती. मी कोणत्या गोष्टीत चांगली आहे आणि लोकांना काय देऊ शकते, हे मला समजून घ्यायचं होतं. ही जबाबदारी माझ्यावर अगदी लहान वयातच सोपवण्यात आली होती किंवा माझ्यावर लादण्यात आली होती, असं म्हणता येईल. त्यानंतर बराच काळ मी या जबाबदारीचे ओझं वाहत राहिले.” असं तिने नमूद केलं.
वडिलांचा वारसा पुढे चालवायचा आहे
मला माझ्या मेहनतीच्या जोरावर नाम कमवायला जवळपास 10-12 वर्ष लागली, असं जेमी म्हणाली. वडिलांचा वारसा पुढे चालवणं ही देखील एक मोठी जबाबदारी असल्याचं तिचं मत आहे. पण आता यश मिळालंय,. तर बसून आराम करूया, असं तिला वाटत नाही. आजही ती तितकीच मेहनत करते, अभ्यासही सुरू असतो. स्वत:ला आणखी उत्तम घडवण्याचा तिचा प्रयत्न असतो आणि क्रिएटिव्हिटी वाढावी यासाठी ती देवाकडे प्रार्थनाही करते. लिव्हर हे फक्त आडनाव नाही, त्यासोबत अतिशय मोठी जबाबदारी येते, असं जेमीचं मत आहे.