जावेद अख्तर यांनी ‘बॉर्डर 2’साठी गाणी लिहिण्यास दिला स्पष्ट नकार; थेट म्हणाले “हे दिवाळखोरीसारखं..”

'बॉर्डर 2' या चित्रपटासाठी जावेद अख्तर यांनी एकसुद्धा गाणं लिहिलं नाही. यामागचं कारण त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे. निर्मात्यांनी त्यांच्याकडे विचारणा केली होती, मात्र त्यांनी स्पष्ट नकार दिला होता.

जावेद अख्तर यांनी बॉर्डर 2साठी गाणी लिहिण्यास दिला स्पष्ट नकार; थेट म्हणाले हे दिवाळखोरीसारखं..
Javed Akhtar
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 20, 2026 | 3:09 PM

सनी देओल, दिलजित दोसांझ, वरुण धवन आणि अहान शेट्टी यांच्या भूमिका असलेला ‘बॉर्डर 2’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर ‘बॉर्डर’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. मूळ चित्रपटातील कलाकार, त्यांचं दमदार अभिनय, संवाद, कथा, गाणी, सिनेमॅटोग्राफी, दिग्दर्शन.. अशा सर्व गोष्टी उत्तम जमून आल्या होत्या. या चित्रपटात अशा बऱ्याच गोष्टी होत्या, ज्या आजसुद्धा प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहेत. अशीच एक गोष्ट म्हणजे यातील गाणी. ‘संदेसे आते है’ हे गाणंही प्रचंड लोकप्रिय आहे. ज्येष्ठ गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. परंतु आता जेव्हा 28 वर्षांनंतर या चित्रपटाला सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, तेव्हा जावेद अख्तर यांनी त्यातील एकही गाणं लिहिलं नाही.

‘बॉर्डर 2’ या चित्रपटासाठी प्रेक्षक फार उत्सुक आहेत. परंतु काही जण यामुळेही नाराज आहेत, कारण त्यात जावेद अख्तर यांनी लिहिलेलं एकही गाणं नाही. सोशल मीडियावर याबद्दल नेटकऱ्यांमध्ये चर्चासुद्धा झाली. ‘घर कब आओगे’ हे गाणं जेव्हा प्रदर्शित झालं, तेव्हा अनेकांनी अख्तर यांचा उल्लेख करत नाराजी व्यक्त केली होती. आता खुद्द जावेद अख्तर यांनी ‘बॉर्डर 2’मध्ये एकही गाणं का लिहिलं नाही, यामागचं कारण सांगितलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले.

जावेद अख्तर यांनी खुलासा केला की त्यांना चित्रपटाच्या निर्मात्यांकडून विचारणा झाली होती. परंतु त्यांनी स्वत:हून गाणं लिहिण्यास नकार दिला होता. ते पुढे म्हणाले, “त्यांनी मला चित्रपटासाठी गाणं लिहायला सांगितलं होतं, परंतु मी त्यांना नकार दिला. खरोखर हे एक प्रकारचं सर्जनशील दिवाळखोरीसारखं वाटतं. तुमच्याजवळ एक जुनं गाणं आहे, जो आधी तुफान हिट झाला होता आणि आता त्यात तुम्ही थोडंसं काहीतरी जोडून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आणू इच्छिता. एकतर नवीन गाणी बनवा किंवा आता तुम्ही त्या स्तराचं काम करू शकत नाही ही गोष्ट स्वीकारा.”

“जे घडलं, त्याला जाऊ द्या. त्याला पुन्हा बनवण्याची काय गरज आहे? आमच्यासमोरही एक जुना चित्रपट होता, जो 1964 मध्ये आला होता. त्याचीही गाणी काही सर्वसामान्य नव्हती. ‘कर चले हम फिदा..’, ‘मैं ये सोचकर उसके दर से उठा था’.. वाह काय गाणी होती! परंतु आम्ही त्या गाण्यांचा वापर केला नव्हता. आम्ही पूर्णपणे नव्याने गाणी लिहिली आणि पूर्ण वेगळ्या पद्धतीने ती गाणी बनवली. त्यामुळे लोकांनाही ती फ्रेश आणि चांगली वाटली. आता जर तुम्ही नवीन चित्रपट बनवत असाल, तर गाणीसुद्धा नवीन बनवा. जुन्या गाण्यांवर का चिपकून बसला आहात? तुम्ही स्वत:च हे कबूल केलंय की तुम्ही तसं काम करू शकणार नाही. तर मग जुन्या प्रतिष्ठेसोबतच जगत राहा”, अशा शब्दांत त्यांनी निर्मात्यांना फटकारलं.

अनेकजण जुन्या आठवणी पुन्हा जिवंत करण्यासाठी जुन्या गोष्टी पुन्हा उलगडण्याला एक मार्केटिंग डाव मानतात, असं म्हटलं असता अख्तर यांनी तीव्र शब्दांत उत्तर दिलं. “मग तुम्ही स्वत: नवीन आठवणी बनवा.”