‘धुरंधर’ला प्रोपगेंडा म्हणणाऱ्यांना जावेद अख्तर यांचं रोखठोक उत्तर; ट्रोलर्सची बोलतीच केली बंद!
रणवीर सिंहचा 'धुरंधर' आणि 'धुरंधर : द रिव्हेंज' या दोन्ही चित्रपटांवर प्रचारकी असल्याचा ठपका लावण्यात आला. या वादावर आता जावेद अख्तर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रोपगेंडाचा आरोप करणाऱ्यांना अख्तर यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर विक्रम रचला. मार्च महिन्यात प्रदर्शित झालेला ‘धुरंधर 2’ हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. एकीकडे रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटावर प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव झाला, तर दुसरीकडे एका वर्गाने या चित्रपटावर ‘प्रोपगेंडा’ (प्रचारकी) असल्याची टीका केली. या वादावर बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिली होती. परंतु दिग्गज गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांच्या प्रतिक्रियेची सध्या सर्वाधिक चर्चा होत आहे. जावेद अख्तर नुकत्याच एका कार्यक्रमात पोहोचले होते. त्यावेळी त्यांना ‘धुरंधर 2’ला ‘प्रोपगेंडा’ बोललं जात असल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.
जावेद अख्तर म्हणाले, “मला एक गोष्ट समजत नाही की, जेव्हा लोक एखाद्या चित्रपटाला ‘प्रोपगेंडा’ म्हणतात, तेव्हा त्याचा अर्थ नेमका काय होतो? मला धुरंधर हा चित्रपट खूप आवडला आहे आणि त्याला मी एक उत्तम चित्रपट मानतो. परंतु वैयक्तिक विचारलं तर मला सीक्वेलपेक्षा धुरंधरचा पहिला भाग जास्त आवडला. प्रत्येक कथेचा स्वत:चा एक पक्ष एक बाजू असते. परंतु फक्त या गोष्टीमुळे तो चित्रपट ‘प्रोपगेंडा’ ठरतो का? कारण त्याची कथा प्रेक्षकांमधील एका विशिष्ट वर्गाला आवडत नाही म्हणून? प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. प्रोपगेंडा असणाऱ्या चित्रपटांमध्ये काय वाईट आहे? प्रत्येक दिग्दर्शकाचं काम सत्य समोर आणणं हेच असतं.”
याविषयी अख्तर यांनी पुढे सांगितलं, “कथाकथनात अगदी फँटसीसारख्या प्रकारातही अनेकदा काहीतरी अंतर्निहित कल्पना किंवा संदेश असतो. आपल्याला जे सत्य पटतं ते चित्रित करणं ही निर्मात्यांची जबाबदारी आहे. प्रेक्षक आपल्या इच्छेनुसार कथेचा अर्थ लावण्यास आणि तिला हवं ते नाव देण्यास स्वतंत्र आहेत.”
या वादावर ज्येष्ठ अभिनेते पियुष मिश्रा यांनीसुद्धा मनमोकळी प्रतिक्रिया दिली होती. “प्रोपगेंडा आणि सिनेमा यांच्यात अत्यंत बारिक रेष असते, धुरंधरसारखी. मला तो चित्रपट खूप आवडला. त्याचा स्क्रीनप्ले जबरदस्त आहे. तो खरा चित्रपट आहे, त्यामुळे धुरंधर खूप आवडला. तुम्ही त्याला प्रोपगेंडा म्हणू शकत नाही. तो चित्रपट आहे,” अशी स्पष्ट प्रतिक्रिया पियुष मिश्रा यांनी दिली होती.