
दरवर्षी नवरात्री येताच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील जेठालाल म्हणजेच अभिनेता दिलीप जोशी यांच्या अंगात एक वेगळाच उत्साह संचारतो. देशभरात नवरात्रीची धूम पहायला मिळत असताना आता दिलीप जोशी यांच्या गरब्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गुजरातमध्ये नवरात्रीत ‘गरबा नाईट्स’टी विशेष धूम पहायला मिळते. दरवर्षी नवरात्रीनिमित्त दिलीप या गरबा नाईट्समध्ये आवर्जून सहभागी होतात. यावर्षीही ते धूमधडाक्यात नवरात्री साजरा करताना दिसले. त्यांच्या गरबा डान्सच्या व्हिडीओवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
दिलीप जोशी यांना डान्स फ्लोरवर असं नाचताना पाहून चाहतेसुद्धा खुश झाले. यावेळी त्यांनी ढोलच्या तालावरही ठेका धरला आणि मनसोक्त नाचले. यावेळी त्यांनी गरबा नाईट्समध्ये आलेल्या पाहुण्यांचीही खास भेट घेतली. त्यांच्यासोबत ते मजामस्करी करतानाही दिसले. एकंदरीत या कार्यक्रमात त्यांनी आणखीनच रंगत आणली होती. दिलीप जोशी यांच्या गरब्याचा व्हिडीओ पाहून अनेकांना दयाबेनचीही आठवण आली. या कार्यक्रमात जेठालालसोबत दयाबेनसुद्धा असती, तर आणखी मजा आली असती, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेच्या चाहत्यांसाठी दयाबेन आणि जेठालाल यांना एकत्र पाहणं फक्त स्वप्नच बनून राहिलं आहे. कारण दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी मालिकेत परतणार नसल्याचे संकेत अनेकदा निर्मात्यांनी दिले आहेत.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिका आहे. गेल्या 16-17 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. गेल्या काही दिवसांत या दिलीप जोशी यांनीसुद्धा मालिका सोडल्याची चर्चा होती. काही एपिसोड्समध्ये जेठालाल आणि बबिता या दोन्ही भूमिका न दिसल्याने चर्चांना उधाण आलं होतं. परंतु दिलीप जोशी आणि मुनमुन दत्ता हे त्यांच्या वैयक्तिक कारणांसाठी सुट्टीवर होती, असं स्पष्टीकरण नंतर निर्मात्यांनी दिलं. दिलीप जोशी या मालिकेत गेल्या 16-17 वर्षांपासून काम करत आहेत. ते साकारत असलेली जेठालालची भूमिका सर्वाधिक लोकप्रिय आहे.