‘गोंधळ’ ऑस्करला जाणार, पण कैलास वाघमारे इथपर्यंत कसा पोहोचला? संघर्षाची कहाणी वाचाच

99व्या अकादमी पुरस्कारांसाठी 'गोंधळ' या मराठी चित्रपटाची भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. 33 चित्रपटांना मागे टाकत 'बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म' श्रेणीत निवड झाल्याने मराठी सिनेसृष्टीसाठी ही अभिमानाची बाब आहे. या यशामुळे अभिनेता कैलास वाघमारेचा भाषा आणि दिसण्यावरून आलेल्या संघर्षाचा प्रवास चर्चेत आला आहे.

‘गोंधळ’ ऑस्करला जाणार, पण कैलास वाघमारे इथपर्यंत कसा पोहोचला? संघर्षाची कहाणी वाचाच
| Updated on: Sep 19, 2026 | 7:22 PM

तब्बल 33 चित्रपटांमधून बाजी मारत ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची 99व्या अकादमी पुरस्कारांसाठी अर्थात ऑस्कर 2027 साठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. मोठ्या व्यावसायिक यशाची नोंद करणाऱ्या चित्रपटांसह अनेक चर्चेत असलेल्या सिनेमांना मागे टाकत ‘गोंधळ’ने ही मानाची संधी मिळवली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने याबाबत अधिकृत घोषणा केली. ‘बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म’ या श्रेणीत भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ‘गोंधळ’ची निवड झाल्याने संपूर्ण चित्रपटाच्या टीमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठीही ही अभिमानाची बाब मानली जात आहे. ‘गोंधळ’च्या ऑस्करवारीमुळे मराठी सिनेसृष्टीचं नाव पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचलं आहे.

दिग्दर्शक संतोष डावखर यांच्या या चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलास वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील आणि प्रशांत देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या ऑस्करवारीची बातमी समोर आल्यानंतर कलाकारांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. चाहत्यांमध्येही ‘गोंधळ’बद्दल उत्सुकता वाढली आहे. चित्रपटातील अभिनेता कैलास वाघमारे यानेही सोशल मीडियावर ‘गोंधळ’मधील काही खास फोटो शेअर करत या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, “आपल्या महाराष्ट्राच्या मातीतला ‘गोंधळ’ ऑस्करच्या शर्यतीत! ९९व्या अकादमी पुरस्कारांसाठी भारताकडून अधिकृत निवड ❤️” कैलासच्या या पोस्टवर चाहत्यांनी आणि कलाकारांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी त्याच्या अभिनयाचं आणि आजवरच्या प्रवासाचं कौतुक केलं.

 

कैलास वाघमारेचा संघर्षाचा प्रवास

अभिनय आणि लिखाणाच्या माध्यमातून विविध विषयांना आणि व्यक्तिरेखांना आपल्या कलाकृतींमधून मांडणारा कैलास वाघमारे आज मराठी मनोरंजनसृष्टीतील परिचित चेहरा आहे. त्याने ‘भिरकीट’, ‘हाफ तिकीट’, ‘भिकारी’, ‘मनातल्या उन्हात’, ‘ड्राय डे’, ‘खिसा’, ‘सायकल’, ‘मयत’, ‘भाऊ’, ‘हिरवी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ या हिंदी चित्रपटात त्याने चुलत्याची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे तो हिंदी चित्रपटसृष्टीतही चर्चेत आला. मात्र चित्रपटांबरोबरच ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाने त्याला मोठ्या प्रमाणावर ओळख मिळवून दिली.

मात्र आजच्या स्थानापर्यंत पोहोचण्याचा कैलासचा प्रवास सहज-सोपा नव्हता. मनोरंजनसृष्टीतील अनुभव, दिसण्यावरून होणारी पारख, रंगामुळे मिळालेले नकार आणि भाषेमुळे आलेल्या अडचणी अशा अनेक प्रसंगांचा त्याला सामना करावा लागला. या संघर्षाबद्दल त्याने काही वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत सविस्तर भाष्य केलं होतं. मनोरंजनसृष्टीत एखाद्या व्यक्तीशी वागताना तिच्या दिसण्यावरून, वागण्यावरून आणि भाषेवरून तिची पारख केली जाते, असा अनुभव कैलासने त्या मुलाखतीत सांगितला होता. सुरुवातीच्या काळात असे अनुभव वारंवार आले. आपला अभिनय, आपलं काम आणि आपलं कौशल्य यापेक्षा आपलं दिसणं आणि भाषा यांनाच अधिक महत्त्व का दिलं जातं, असा प्रश्नही त्याला पडत असे.

भाषेमुळेही पचवावे लागले नकार

कैलास वाघमारे हा मूळचा जालन्याचा. मुंबईत आल्यानंतर त्याला भाषेशी संबंधित अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ‘आनी-पानी’सारख्या भाषेतील फरकांमुळेही त्याला काही अनुभव आले. मुंबईच्या वातावरणाशी आणि इथल्या जीवनशैलीशी जुळवून घेताना सुरुवातीचा बराच काळ गेला, असं त्याने सांगितलं होतं. भाषेवर काम करताना ‘न’च्या जागी ‘ण’ जाणीवपूर्वक बोलण्याचा सराव केल्याचंही त्याने नमूद केलं होतं. मात्र पुढे त्याच्या मातीतल्या भाषेनेच त्याला वेगळी ओळख मिळवून दिली.

‘प्रमाण भाषा’ नसल्याने काही अडलं नाही

‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकात जालन्याच्या असलेल्या कैलासने आपल्या बोलीभाषेत भूमिका साकारली. या नाटकाला प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद त्याच्यासाठी महत्त्वाचा ठरला. या यशामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला आणि त्यानंतर त्याला चित्रपटांच्या संधीही मिळू लागल्या. याबद्दल बोलताना कैलासने आपल्या भाषेविषयी महत्त्वाचं मत मांडलं होतं. प्रमाण भाषा आणि ग्रामीण भाषा यापैकी एक चांगली आणि दुसरी वाईट, असा भेद करण्याला त्याचा विरोध आहे. आपल्या गावातली भाषा तिथल्या लोकांसाठी तितकीच शुद्ध आहे, तर मुंबईत बोलली जाणारी भाषा मुंबईची शुद्ध भाषा आहे, असा त्याचा दृष्टिकोन आहे. ‘प्रमाण भाषा न आल्यामुळे माझं काही अडलं नाही,’ असं त्याने सांगितलं होतं. संघर्ष, नकार आणि भाषेच्या अडचणींवर मात करत त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us