Kangana Ranaut : एका परदेशी स्त्रीच्या येण्यानं गांधी कुटुंबात झालेले अनेक मृत्यू, हा एक विलक्षण योगायोग, सोनिया गांधी यांच्याबद्दल कंगनाचं वक्तव्य
Kangana Ranaut On Sonia Gandhi : कंगना रणौतनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सोनिया गांधी यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदार कंगना रणौत आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. तिनं काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्याबद्दल भाष्य केलं आहे. कंगनानं सोनिया गांधींच्या राजकीय प्रवासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि गांधी कुटुंबाशी संबंधित घटनांना योगायोगांची मालिका म्हटलं.
कंगना रणौतची पोस्ट
आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर कंगनानं सोनिया गांधींबद्दल लिहिलं की, ‘सर्वजण एनव्हिडिया हनी ट्रॅप वादाबद्दल बोलत आहेत. मी भारतीय राजकारण आणि आणीबाणीच्या काळातील गांधी कुटुंबावर खूप संशोधन केलं आहे. मला हे कधीच समजलं नाही की, एक रहस्यमय परदेशी नागरिक गांधी कुटुंबात कसा प्रवेश करतो, त्यानंतर इंदिरा गांधी, संजय गांधी आणि राजीव गांधी—हे सर्व सत्तेचे संभाव्य उत्तराधिकारी मारले जातात. शेवटी, सत्तेसाठी फक्त एकच उमेदवार उरतो, परदेशी नागरिक सोनिया गांधी.’
कंगनानं पुढे लिहिलं, ‘इतके योगायोग कसे जुळून आले, हे लोकांना विचित्र वाटलं नाही. इतकंच नाही, तर त्या परदेशी महिलेनं उघडपणे परदेशी अजेंड्याचा प्रचार केला आणि दहशतवाद्यांसाठी खोटे अश्रू ढाळले. तरीही, २०१४ पर्यंत त्यांनी अनेक दशकं राज्य केलं.’ तसेच, ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान कंगनानं सांगितलं की, ती इंदिरा गांधींना केवळ राहुल गांधींची आजी म्हणून पाहत नाही. तिच्या मते, इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या आणि त्यांचा इतिहास सर्व भारतीयांशी जोडलेला आहे.
2014 च्या सार्वत्रिक निवडणुका एक मोठा उलथापालथ ठरल्या. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षानं 282 जागा जिंकल्या आणि एनडीए आघाडीनं सरकार स्थापन केलं. पंतप्रधान मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. दुसरीकडे, काँग्रेसला केवळ 44 जागा मिळाल्या, ज्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीचे (यूपीए) दहा वर्षांचे राज्य संपुष्टात आलं.
कंगना रणौतच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती ‘भारत भाग्य विधाता’ या ड्रामा चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसलेली. हा चित्रपट 12 जून, 2026 रोजी प्रदर्शित झाला. 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांनी दाखवलेले शौर्य आणि धाडस दाखवणं हा या चित्रपटाचा उद्देश होता.